महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळावरील आपत्ती व्‍यवस्‍थापनाचा अहवाल अद्ययावत करावा !

हिंदु जनजागृती समिती अंतर्गत ‘सुराज्‍य अभियान’कडून जळगाव महापालिका आयुक्‍तांकडे मागणी !

जळगाव (वार्ता.) – जळगाव महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळावर आपत्ती व्‍यवस्‍थापनाच्‍या संदर्भात सद्यःस्‍थितीत जो अहवाल ठेवलेला आहे, तो वर्ष २००९ चा आहे. त्‍या अहवालातील आपत्ती व्‍यवस्‍थापनाच्‍या संदर्भात जे संबंधित विभाग आहेत, तेथील अधिकार्‍यांची नावे आणि त्‍यांचे संपर्क क्रमांक हे सर्व वर्ष २००९ च्‍या नुसार असल्‍याने आपत्‍कालीन परिस्‍थितीतील जळगाव शहरातील जनतेला या जुन्‍या माहितीमुळे गंभीर परिस्‍थितीला सामोरे जावे लागू शकते. त्‍यामुळे अद्ययावत अहवाल महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळावर ठेवण्‍यात यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती अंतर्गत ‘सुराज्‍य अभियान’च्‍या वतीने मनपा आयुक्‍त विद्या गायकवाड यांच्‍याकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली. सुराज्‍य अभियानाच्‍या वतीने श्री. विजय पाटील आणि श्री. प्रशांत जुवेकर यांनी निवेदन दिले.

‘आपत्‍कालीन स्‍थिती उद़्‍भवल्‍यास संबंधित अधिकारी, त्‍यांचे संपर्क क्रमांक, तसेच लागणारी सर्व महत्त्वपूर्ण माहिती या अहवालात समाविष्‍ट करावी, हे अहवाल संकेतस्‍थळावर ठेवल्‍याचे जळगावकर जनतेला समजावे, यासाठी सामाजिक प्रसारमाध्‍यमे, वृत्तपत्रे, प्रसिद्धीपत्र (प्रेसनोट) यांद्वारे माहिती देण्‍यात यावी. ज्‍या संबंधित अधिकार्‍यांनी असा अहवाल ठेवण्‍यात कुचराई केली आहे, त्‍यावर आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात यावी’, याही मागण्‍या निवेदनाच्‍या माध्‍यमातून पालिकेकडे करण्‍यात आल्‍या आहेत.

संपादकीय भूमिका :

  • सर्वच महापालिकांनी संकेतस्‍थळावरील कोणकोणते अहवाल अद्ययावत करायचे आहेत, हे पहावे !
  • अशी मागणी का करावी लागते ? आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या हे लक्षात येत नाही का ?