१. सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून दिलेले स्फटिकाचे शिवलिंग ‘जणू शिवाचे आत्मलिंगच आहे’, असे वाटणे आणि नाडीवाचनातही तसाच उल्लेख असणे
‘वर्ष २०२१ च्या जानेवारी मासातील पहिल्या आठवड्यात नाडीवाचन क्रमांक १६४ मध्ये उल्लेख असल्यानुसार सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून मला स्फटिकाचे एक शिवलिंग दिले. हे शिवलिंग मुठीच्या आकाराचे आहे. ते पिढ्यान् पिढ्या पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या परंपरेत ठेवले होते. नाडीवाचनात महर्षी पुढे म्हणाले, ‘हे शिवलिंग तुमच्याजवळ ठेवा. ते तुमचे रक्षण करील.’ त्या वेळी ‘शिवाने आद्य शंकराचार्यांना त्याचे आत्मलिंग दिले होते. त्याप्रमाणेच हे स्फटिकाचे शिवलिंग म्हणजे शिवाचे आत्मलिंगच आहे आणि शिवानेच मला ते दिले आहे’, असे मला जाणवले. नाडीवाचनातही महर्षींनी नेमकेपणाने असाच उल्लेख करून ‘प्रत्यक्ष शिवानेच ते तुम्हाला दिले’, असे म्हटले होते.
२. आत्मलिंगे असलेले आद्य शंकराचार्यांचे मठ पहातांना ‘स्वतःलाही धर्मकार्यासाठी शिवाचे असे आत्मलिंग मिळायला हवे’, असा विचार मनात येणे आणि स्फटिकाचे शिवलिंग मिळाल्यावर ‘सनातनच्या धर्मकार्याला आशीर्वाद म्हणून शिवाने जणू त्याचे आत्मलिंगच दिले आहे’, असे जाणवणे
भगवंताने आद्य शंकराचार्यांना दिलेली ४ आत्मलिंगे जेथे स्थापित आहेत, तेथे आता शंकराचार्यांचे ४ मठ आहेत. एकदा या लिंगांचे दर्शन घेतांना मला ‘शिवाने आपल्यालाही धर्मकार्यासाठी त्याचे स्फटिकाचे लिंग दिले पाहिजे’, असे वाटले होते. नंतर मी हा विचार विसरून गेले; परंतु महर्षींनी मला पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून स्फटिकाचे शिवलिंग दिले. त्या वेळी ‘खरोखरच सनातनच्या धर्मकार्याला आशीर्वाद म्हणून शिवाने जणू मला त्याचे आत्मलिंगच दिले आहे’, असे मला वाटले.
३. ८५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या समष्टी संतांच्या मनात येणारा ‘एखादी गोष्ट हवी’, हा विचार सकामातील नसून तो ईश्वरेच्छेने आलेला असणे
‘मला असे शिवलिंग हवे’, हा माझ्या मनातील विचार सकामातील नव्हता. ते एक ईश्वरी नियोजनच होते. ती ईश्वराचीच इच्छा होती. ‘८५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या समष्टी संतांच्या मनात ‘एखादी गोष्ट हवी’, असा विचार येणे’, हे सकाम इच्छा करणारे किंवा भावनिक नसते, तर ‘त्यांच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा ईश्वरेच्छेनेच आलेला असतो’, असे मला वाटले.
४. विश्वव्यापक कार्य होण्यासाठी स्वतःचे अस्तित्व नको !
बर्याच वेळा मला ‘आपण करतो, ते ईश्वर नियोजितच आहे. यात स्वतःचे वेगळेपण असे काही उरलेले नाही’, असे वाटते आणि अध्यात्मात असेच हवे. स्वतःचे अस्तित्वच नको, तरच विश्वव्यापक कार्य होते; कारण ईश्वराला काहीच अशक्य नसते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, कोळ्ळीमलई, तमिळनाडू (१५.१.२०२१)
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेली दैवी अनुभूतीश्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना स्वतःच्या कपाळावरून हात फिरवतांना ‘स्वतःच्या तिसर्या डोळ्यावरून हात फिरवत आहे’, असे जाणवणे : ‘नोव्हेंबर २०२० मध्ये एकदा माझे डोके दुखत होते; म्हणून मी कपाळाला बाम लावत होते. मी कपाळावर हात फिरवतांना अकस्मात् ‘मी माझ्या तिसर्या डोळ्यावरून हात फिरवत आहे’, असे मला वाटले. मला तो स्पर्श अगदी एक सेकंदच जाणवला होता. मी गुरुदेवांना याविषयी सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘आता स्थुलातील युद्धाचा काळ चालू झाला असल्याने प्रकट शक्तीची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्हाला कपाळावरून हात फिरवतांना तसे जाणवले.’’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, कोळ्ळीमलई, तमिळनाडू. (१५.१.२०२१) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |