अहिल्यानगर येथून ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

  • आतंकवादविरोधी पथकाची कारवाई !

  • बनावट कागदपत्रे बनवून भारतात शिरले

  • चौघांना घुसखोरीसाठी साहाय्य करणार्‍या १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

अहिल्यानगर – दलालांच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे बनवून भारतात घुसखोरी करणार्‍या ४ बांगलादेशी नागरिकांना नाशिक आणि अहिल्यानगर यथील आतंकवादविरोधी पथकाने अहिल्यानगर शहराजवळ अटक केली. मोहीउद्दीन नाझीम शेख (वय ३६ वर्षे), शहाबुद्दीन जहांगीर खान (वय २७ वर्षे), दिलावरखान सिराजउल्ला खान (वय २७ वर्षे) आणि शहापरान जहांगीर खान (वय २० वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. या चौघांसह त्यांना बनावट मतदान ओळखपत्र, पारपत्र, आधारकार्ड, जन्माचे दाखले, अधिकोषाचे पासबूक आदी कागदपत्रे बनवून देणार्‍या बंगाल आणि बांगलादेशातील १० जणांच्या विरोधातही नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रासल एजाज शेख, सोहेल, माणिक खान, नोमान, अब्दुल कादर, कोबीर मंडल अशी या १० जणांमधील काही आरोपींची नावे आहेत. (या संपूर्ण टोळीवरही कठोर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक)

१. मोहीउद्दीन शेख याला १० ते ११ वर्षांपूर्वी त्याच्या ओळखीचा रासल एजाज शेख याने बांगलादेशातून हसनाबादमार्गे पायी बंगाल येथे बेकायदेशीर मार्गे नेले. तेथून रेल्वेने कल्याण येथे आणले. तेव्हापासून तो भारतात बेकायदेशीररित्या रहात आहे. मागील ७ – ८ वर्षांपासून तो खंडाळा (अहिल्यानगर) येथे आहे. शेख याने रासल या दलालाला भारतात प्रवेश करण्यासाठी १० सहस्र रुपये दिले होते.

२. शहाबुद्दीन जहाँगीर खान याला सोहेल याने ६ ते ७ वर्षांपूर्वी बांगलादेश येथून आगरतळा येथे बेकायदेशीररित्या आणले. तेथून कोलकाता आणि नंतर कल्याण येथे त्याला आणण्यात आले. त्याबदल्यात सोहेल खान याने १७ सहस्र रुपये दिले. मागील ८ मासांपासून तोही खंडाळा (अहिल्यानगर) येथे रहात आहे.

३. दिलावरखान सिराजउल्ला खान याला माणिक खान याने ३ वर्षांपूर्वी बांगलादेश येथून आगरतळा आणि तेथून कल्याण येथे आणले. त्या बदल्यात त्याला १० सहस्र रुपये देण्यात आले. गेल्या ३ मासांपासून तो खंडाळा येथे रहात आहे.

४. शहापरान जहाँगीर खान याला नोमान याने १ वर्षापूर्वी बांगलादेश येथून अवैधरित्या आगरतळा आणि तेथून रेल्वेने कल्याण येथे आणले. त्याबदल्यात त्याला खान याने १५ सहस्र रुपये दिले. तेव्हापासून तो अवैधरित्या भारतामध्ये रहात आहे. मागील ६ मासांपासून तो खंडाळा येथे रहात आहे.

संपादकीय भूमिका 

  • घुसखोरांचा देश भारत ! खोटी कागदपत्रे बनवून घुसखोर भारतात प्रवेश करतात आणि पोलीस किंवा प्रशासन यांना याचा थांगपत्ताही लागत नाही, हे संतापजनक !
  • अशा घुसखोरांना भारतातून हाकलूनच द्यायला हवे !