गोवा विधानसभेचे पावित्र्य अबाधित ठेवा !

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गोवा विधानसभेतील लोकप्रतिनिधींना आवाहन

गोवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करतांना

पणजी, २३ ऑगस्ट (वार्ता.) – संसद आणि विधानसभा या देशाचे सार्वभौमत्वाचे प्रतिनिधित्व करणार्‍या पवित्र संस्था आहेत. या पवित्र ठिकाणी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी लोकांच्या समस्यांवर चर्चा करून जनतेच्या हितासाठी निर्णय घेत असतात आणि यामुळे या ठिकाणी लोकप्रतिनिधींचे प्रभावी अन् अर्थपूर्ण योगदान महत्त्वाचे आहे. गोवा विधानसभेच्या अधिवेशनाचे गेल्या अनेक वर्षांपासून थेट प्रक्षेपण होत आहे. या प्रक्षेपणामुळे सर्वसामान्य जनता लोकप्रतिनिधी कसे वागतात ? आणि ते प्रश्न कसे मांडतात ? हे पहात आहेत. या थेट प्रक्षेपणामुळे लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यामधील नाते आणखी बळकट होत आहे अन् लोकप्रतिनिधींवरील दायित्वही वाढत आहे. लोकप्रतिनिधींचे सभागृहातील वर्तन हे सभ्य असणे आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. गोवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करत होत्या. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांचीही उपस्थिती होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुढे म्हणाल्या, ‘‘गोवा विधानसभेत पूर्वीपासून सकारात्मक चर्चा होत असते, असे ऐकून चांगले वाटले. गोव्यात विविध धर्मांचे लोक असूनही ते ‘एक गोवा’ आणि ‘एक भारत’ यावर विश्वास ठेवत आहेत. ही एकोप्याची भावना गोमंतकियांमध्ये पूर्वीपासून आहे. गोवा मुक्त झाल्याविना देशाचे स्वातंत्र्य अपूर्ण राहिले असते. गोव्याच्या मुक्तीसाठी देशाच्या तिरंग्याचा वापर करणे आणि ‘जय हिंद’ अशा घोषणा देणे यांमुळे परकीय राजवटीतून मुक्त झाल्यानंतर गोमंतकियांना भारतात एकरूप व्हायचे होते, हे सिद्ध होते. गोवा राज्य अनेक गोष्टींत आघाडीवर आहे. गोव्याचा विकासदर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अडीचपट अधिक आहे.

पाणी व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, आदी अनेक क्षेत्रांत देशभरात गोवा आघाडीवर आहे; मात्र महिलांचा सार्वजनिक जीवन आणि कामाच्या ठिकाणी सहभाग वाढणे आवश्यक आहे. काम करणार्‍या महिलांचे प्रमाण गोव्यात अल्प आहे आणि हे गोव्यासाठी अशोभनीय आहे. ही स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.’’या वेळी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई म्हणाले, ‘‘गोमंतकीय जनता सद्गुणी असल्याने गोव्याच्या इतिहासात मोठ्या स्वरूपात धार्मिक दंगली घडलेल्या नाहीत. लोकशाहीच्या सर्व स्तंभांनी आपली ‘लक्ष्मण रेखा’ ओळखून वागले पाहिजे.’’

संपादकीय भूमिका

राष्ट्रपतींनी लोकप्रतिनिधींना असे आवाहन करावे लागणे, हे लोकप्रतिनिधींनी चिंतन करण्यासारखे !