रतन टाटा हे उद्योग आणि सामाजिक जाणिवा यांचे चालते-बोलते विद्यापीठ ! – राज्‍यपाल रमेश बैस

रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्‍काराने गौरव !

ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना “उद्योगरत्न पुरस्कार” प्रदान करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मंत्री

 मुंबई – रतन टाटा यांनी चहा, मीठ, स्‍टील, ‘ऑटोमोबाईल्‍स’, ‘आय्.टी.’, विमानबांधणी अशा वैविध्‍यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योगाला जागतिक समूहात रूपांतरित केले. रतन टाटा केवळ एक व्‍यक्‍ती नाहीत, तर संस्‍था आहेत. ते उद्योग, नवीन उपक्रम आणि सामाजिक जाणिवा यांचे चालते-बोलते विद्यापीठ आहेत, असे गौरवोद्वार महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल रमेश बैस यांनी काढले.  टाटा उद्योग समूहाचे संस्‍थापक अध्‍यक्ष रतन टाटा यांना राज्‍यशासनाच्‍या पहिल्‍या ‘उद्योगरत्न’ पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले. रतन टाटा यांच्‍या वतीने टाटा उद्योग समुहाचे अध्‍यक्ष चंद्रशेखरन् यांनी पुरस्‍कार स्‍वीकारला. या वेळी ‘उद्योगरत्न’, ‘उद्योगिनी’ आणि ‘उत्‍कृष्‍ट मराठी उद्योजक’ हे पुरस्‍कारही प्रदान करण्‍यात आले.

२० ऑगस्‍ट या दिवशी शहरातील ‘जिओ वर्ल्‍ड कन्‍व्‍हेन्‍शन सेंटर’ येथे हा कार्यक्रम पार पडला. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत या वेळी उपस्‍थित होते.

‘उद्योगमित्र पुरस्‍कार’ आदर पुनावाला, ‘उद्योगिनी पुरस्‍कार’ गौरी किर्लोस्‍कर यांना, तर ‘उत्‍कृष्‍ट मराठी उद्योजक पुरस्‍कार’ विलास शिंदे यांना प्रदान करण्‍यात आला. ‘उद्योगरत्न’ पुरस्‍कार २५ लाख रुपये, ‘उद्योगमित्र’ पुरस्‍कार १५ लाख रुपये, ‘उद्योगिनी’ आणि ‘उत्‍कृष्‍ट मराठी उद्योजक’ पुरस्‍कार ५ लाख रुपये, तसेच सर्व पुरस्‍कारांसह सन्‍मानचिन्‍ह आणि मानपत्र असे या पुरस्‍काराचे स्‍वरूप होते.

राज्‍यपाल रमेश बैस पुढे म्‍हणाले, ‘‘रतन टाटा यांनी महाराष्‍ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्‍कार स्‍वीकारून महाराष्‍ट्र शासन आणि पुरस्‍कार यांची प्रतिष्‍ठा वाढवली आहे. आदर पूनावाला यांच्‍या नेतृत्‍वाखाली ‘सीरम इन्‍स्‍टिट्यूट’ने ‘कोविशिल्‍ड’ लस विकसित करून देशाचा नावलौकिक वाढवला. गौरी किर्लोस्‍कर यांना देण्‍यात येणारा ‘उद्योगिनी’ पुरस्‍कार सर्व महिला उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे, तर ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स’ आस्‍थापनाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक विलास शिंदे यांना दिला गेलेला हा महाराष्‍ट्रातील प्रगतीशील शेतकर्‍यांचा पुरस्‍कार आहे.’’

या वेळी एकनाथ शिंदे यांनी ‘गरजवंताच्‍या साहाय्‍यासाठी देव नेहमी धावतो. टाटा म्‍हणजे अढळ विश्‍वास, गुणवत्तेची निश्‍चिती आणि सामाजिकतेचे प्रचंड भान आहे’, अशा शब्‍दांत रतन टाटा यांचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस यांनी ‘टाटा ट्रस्‍ट’ने आधुनिक भारताच्‍या विकासात अमूल्‍य योगदान दिले आहे. ‘जगात पाचव्‍या क्रमांकावर असलेला टाटा समूह महाराष्‍ट्रात आहे’, याचा आम्‍हाला अभिमान असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले. या वेळी पुरस्‍कारप्राप्‍त उद्योजकांनी मनोगत व्‍यक्‍त केले.