सनातनचे ४६ वे संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांच्‍या घरी जाऊन सेवा करतांना ‘संतांची वास्‍तू आणि वस्‍तू यांमध्‍ये चैतन्‍य असते’, याची साधिकेला आलेली अनुभूती !

निज श्रावण शुक्‍ल पंचमी (२१.८.२०२३) या दिवशी सनातनचे ४६ वे (समष्‍टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय यांचा ८५ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्त पू. भगवंत कुमार मेनराय यांच्‍या घरातील साहित्‍य आवरण्‍याची सेवा करतांना देहली सेवाक्रेंद्रातील साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

पू. भगवंत कुमार मेनराय

पू. भगवंत कुमार मेनराय यांना ८५ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

‘जून २०२३ मध्‍ये सुश्री (कु.) संगीता मेनरायताई (पू. भगवंत कुमार मेनरायकाका यांची मुलगी) देहलीला आल्‍या होत्‍या. तेव्‍हा आम्‍हाला सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांनी सांगितले, ‘‘आता आपल्‍याला पू. मेनरायकाका आणि पू. (कै.) सौ. मेनराय काकू यांच्‍या घरी जाऊन तेथील सर्व साहित्‍याची बांधणी करायची आहे आणि ते साहित्‍य ‘व्‍ही.आर्.एल्.’ने (कुरियरने) पाठवण्‍याचे नियोजन करायचे आहे. त्‍यासह घराच्‍या विक्रीशी संबंधित संगीताताईंचीही काही कामे असतील, तर त्‍यासाठी त्‍यांना साहाय्‍य करायचे आहे.’’

पू. (सौ.) सूरजकांता मेनराय

१. प्रतिदिन पू. मेनरायकाकांच्‍या घरी जाऊन साहित्‍याच्‍या वर्गीकरणाची सेवा करणे

गुरुदेवांच्‍या कृपेने मला पू. काकांच्‍या घराच्‍या स्‍थलांतराच्‍या सेवेत सहभागी होण्‍याची संधी मिळाली. देहली सेवाकेंद्रातून आम्‍ही ३ – ४ साधक प्रतिदिन पू. मेनरायकाकांच्‍या घरी जात होतो. ‘त्‍यांच्‍या घरी जाऊन तेथील सर्व साहित्‍य बाहेर काढून त्‍याचे वर्गीकरण करणे, ‘त्‍यातील कोणते साहित्‍य आवश्‍यक आहे किंवा अनावश्‍यक आहे ?’, हे पाहून ते वेगवेगळे करणे’ इत्‍यादी सेवा होत्‍या.

सुश्री (कु.) संगीता मेनराय

२. पू. मेनरायकाकांच्‍या घरी सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

२ अ. पू. काकांचे घर पुष्‍कळ दिवसांपासून बंदच होते; परंतु तरीही घरात पुष्‍कळ चैतन्‍य जाणवत होते.

२ आ. त्‍यांच्‍या घरात धूळही साठली होती. इतर वेळी पुष्‍कळ धूळ असलेल्‍या ठिकाणी गेल्‍यावर मला पुष्‍कळ त्रास होतो; परंतु त्‍यांच्‍या घरी मला धुळीचा त्रास मुळीच झाला नाही.

कु. मनीषा माहुर

२ इ. त्‍या वेळी मला वाटत होते, ‘आपण आश्रमातच सेवा करत आहोत.’ सद़्‍गुरु पिंगळेकाकाही आमच्‍या समवेत खाली बसून आम्‍हाला सर्व साहित्‍याचे वर्गीकरण करण्‍याची सेवा शिकवत होते.

२ ई. ‘संतांनी वापरलेल्‍या वस्‍तू चैतन्‍यमय आहेत’, असे वाटणे आणि सेवा केल्‍यावर पुष्‍कळ चैतन्‍य अन् उत्‍साह जाणवणे : पुष्‍कळ महत्त्वाच्‍या, तसेच लहान लहान अन् सुंदर वस्‍तू पू. (कै.) मेनरायकाकूंनी जपून ठेवल्‍या होत्‍या. ‘संतांनी वापरलेल्‍या वस्‍तू एवढ्या वर्षांनंतरसुद्धा पुष्‍कळ चैतन्‍यमय आहेत’, असे आम्‍हाला जाणवत होते. ‘त्‍या वस्‍तूंमुळे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय होऊ शकतात’, असा विचार करून आम्‍ही त्‍या वेगळ्‍या ठेवल्‍या होत्‍या. प्रतिदिन सेवा करून आल्‍यानंतरही आम्‍हाला पुष्‍कळ चैतन्‍य आणि उत्‍साह जाणवत होता.

२ उ. संगीताताईंनी पू. मेनरायकाका आणि पू. (कै.) काकू यांच्‍या काही वस्‍तू देहली सेवाकेंद्रात वर्गीकरण करण्‍यासाठी आणल्‍या होत्‍या. तेव्‍हा त्‍या सेवेच्‍या खोलीत दैवी कण दिसत होते.

२ ऊ. संगीताताईंनी सांगितले, ‘‘जेव्‍हा आमच्‍या घराच्‍या जुन्‍या लाद्या पालटून नवीन लाद्या बसवत होते, तेव्‍हा पू. काकूंनी नामजपाच्‍या पट्ट्या मध्‍ये मध्‍ये घालायला सांगितल्‍या होत्‍या. त्‍यामुळे संपूर्ण घरात चैतन्‍य निर्माण झाले होते.’’

‘गुरुदेव आणि सद़्‍गुरु पिंगळेकाका यांच्‍या कृपेमुळे मला संतांच्‍या घराच्‍या संदर्भातील ही अमूल्‍य सेवा करण्‍याची संधी लाभली’, याबद्दल मी त्‍यांच्‍या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– कु. मनीषा माहूर, देहली सेवाकेंद्र (८.८.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक