रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात लागवडीसंबंधी सेवा करतांना अकस्‍मात् झालेले नागदेवतांचे अद़्‍भुत दर्शन !

श्री. रामचंद्र कुंभार

१. रामनाथी आश्रमातील लागवड परिसरात नागदेवतेचे स्‍थान असणे

‘रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमाच्‍या लागवड परिसरामध्‍ये एक नागदेवतेचे स्‍थान आहे. साधकांना आश्रम दाखवतांना लागवडीतील नागदेवतेचे स्‍थानही दाखवले जाते. सनातन संस्‍थेकडून अमावास्‍या आणि पौर्णिमा या तिथींना नागदेवतेला नैवेद्य ठेवला जातो.

२. लागवडीमध्‍ये सेवा करत असतांना ‘एकदा तरी नागदेवतेचे दर्शन घडावे’, असे वाटणे

रामनाथी आश्रमात मी पहिल्‍यापासूनच लागवडीसंबंधी सेवा करत आहे. सेवा चालू करण्‍यापूर्वी मी नागदेवतेला प्रार्थना करतो आणि सायंकाळी सेवा संपल्‍यावर कृतज्ञता व्‍यक्‍त करून सेवा थांबवतो. काही साधकांनी मला विचारले, ‘‘तुम्‍हाला नागदेवता कधी दिसली आहे का ?’’ मी त्‍यांना ‘‘नाही’’, असे सांगितले; पण तेव्‍हापासून ‘मला एकदा तरी नागदेवतेचे दर्शन व्‍हावे’, अशी माझ्‍या मनात तीव्र इच्‍छा आणि उत्‍सुकताही निर्माण झाली.

३. आंब्‍याची राखण करण्‍यासाठी असलेला कुत्रा जोरात भुंकू लागणे, ‘तो का भुंकत आहे ?’, हे पहातांना एका मोठ्या नागाचे दर्शन होणे

नेहमीप्रमाणे मी आंब्‍याची राखण करण्‍यासाठी मोतीला (लागवडीतील कुत्र्याला) तेथील पत्र्याच्‍या छपराखाली (शेडमध्‍ये) बांधले. नंतर मी अन्‍य सेवा करण्‍यासाठी गेलो. काही वेळाने मोती जोरजोराने सारखा भुंकू लागला. मला वाटले, ‘वानर आंबे खाण्‍यासाठी बागेत आले आहेत’; म्‍हणून मी हाताने टाळ्‍या वाजवत आणि तोंडाने वानरांना हाकलण्‍यासाठी आवाज देत वर झाडांकडे पहातच मोतीकडे आलो. मोती खाली पाहून भुंकतांना पाहून माझे लक्ष खाली गेले. पहातो, तर माझ्‍या पायापासून अगदी १ फुटाच्‍या अंतरावर एक नाग शांतपणे अगदी मुंगीच्‍या चालीने चालला होता. मोती त्‍याच्‍याकडे पाहून भुंकत होता. देवाच्‍याच कृपेने माझी दृष्‍टी खाली गेली. नाहीतर, माझे पुढचे पाऊल नागावरच पडले असते. देवानेच मला वाचवले. मी नागाजवळ येईपर्यंत माझे टाळ्‍या वाजवणे आणि वानरांना हाकलण्‍यासाठी मोठ्याने ओरडणे चालूच होते, तरीही तो मुंगीच्‍या चालीनेच चालला होता. खरेतर, माणसाची चाहूल लागताच नाग जोरात पळतात.

४. नागाचा रंग अन्‍य नागांप्रमाणे नसून चंदेरी असणे, ‘त्‍याचे दर्शन व्‍यवस्‍थित होण्‍यासाठीच तो मंद गतीने चालत आहे’, असे वाटणे

त्‍याचा रंग अन्‍य नागांप्रमाणे नव्‍हता. त्‍याचा रंग चंदेरी होता. तो जाड आणि लांबही होता. मी न घाबरता अगदी डोळे भरून त्‍याला पाहून घेतले. मला वाटले, ‘जणूकाही मला त्‍याचे व्‍यवस्‍थित दर्शन घेता यावे’, यासाठीच तो शांतपणे आणि हळूहळू चालत आहे.’

५. परात्‍पर गुरु पांडे महाराज यांनी ‘देवाने तुमची नागाचे दर्शन घ्‍यायची इच्‍छा पूर्ण केली’, असे सांगणे

काही वेळाने मी दूरभाष करून देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात वास्‍तव्‍यास असणार्‍या परात्‍पर गुरु परशराम पांडे महाराज यांना ही गोष्‍ट सांगितली. तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘नागदेवतेला पहायची तुमची इच्‍छा होती ना ? ती पूर्ण झाली.’’

६. काही दिवसांनी दुसर्‍या निळ्‍या रंगाच्‍या नागाचे दर्शन होणे

१४.११.२०२२ या दिवशी खंड्या (लागवडीतील कुत्रा) आवारात मोकळा सोडला होता; मात्र तो एकाच जागी उभा राहून सारखा भुंकत होता; म्‍हणून मी पहायला गेलो. तेव्‍हा मला पूर्वी नाग दिसला होता, त्‍याच जागेवर एक नाग फणा काढून बसलेला दिसला. त्‍या नागाच्‍या फण्‍याकडील पुढील भाग निळसर होता आणि त्‍याच्‍या अंगावरील पट्टेही निळसर होते. खंड्या त्‍याला पुढे जाऊ देत नव्‍हता आणि तो खंड्याला त्‍याच्‍याकडे येऊ देत नव्‍हता. असे ४५ मिनिटे चालू होते. मी त्‍याचे चित्रीकरण केले. नंतर खंड्याला बोलावून बाजूला घेतले.

७. दोन्‍ही नाग तेजस्‍वी दिसून ‘ते साधकांच्‍या रक्षणार्थ आहेत’, असे वाटणे

मला लागवडीत प्रथम दिसलेला नाग आणि आता दिसलेला नाग या दोन्‍ही नागांकडे पाहून भीती वाटली नाही. ‘त्‍यांच्‍याकडे पुनःपुन्‍हा पहात रहावे’, असे मला वाटले. ते दोन्‍ही नाग तेजस्‍वी आणि प्रकाशमान दिसत होते. ‘ते सर्व साधकांच्‍या रक्षणासाठी असावेत’, असे मला वाटले.

८. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘नाग चांगला आहे’, असे सांगून त्‍याविषयी लिहून देण्‍यास सांगणे

त्‍यानंतर काही मासांनी मी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नाग आणि खंड्या यांचे मी केलेले चित्रीकरण दाखवले. ते म्‍हणाले, ‘‘नाग चांगला आहे. तुम्‍ही याविषयीचे लिखाण करून द्या.’’

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने मला हे प्रत्‍यक्ष अनुभवता आल्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. रामचंद्र (दादा) कुंभार (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ६१ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२३)