आजपासून श्रावण मास चालू होत आहे. त्या निमित्ताने….
शिवाला अत्यंत प्रिय असणारा असा हा ‘श्रावण मास’ आहे. या मासात केली जाणारी व्रते आणि साजरे केले जाणारे धार्मिक सण यांविषयीची माहिती येथे देत आहोत.
१. शिव उपासना
‘जलधारा शिवप्रियः ।’, या न्यायाने संपूर्ण श्रावण मास शिवाभिषेक करावा; कारण भगवान शिवाला सर्वांत आवडती वस्तू जल आहे. शिव मंदिरात पिंडीवर अखंड जलधारा ठेवली जाते. शिवपूजनात बेलाचे विशेष महत्त्व आहे. त्रिजन्मपाप संहाराचे सामर्थ्य एक बेल पत्र समर्पण करण्यास सांगितले आहे. शिव उपासनेत ‘चिंतामणी पार्थिवेश्वर पूजनाचे’ एक वेगळे महत्त्व आहे. नित्य मातीचे शिवलिंग सिद्ध करावे. त्याचे पूजन करून विर्सजन करावे, अशी ही पुराण प्रसिद्ध शिव उपासना आहे.
२. श्रावणी सोमवार
श्रावण मासातील सोमवाराला विशेष महत्त्व आहे. या दिवशी शिवाची उपासना अधिक फलदायी असते. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वहाण्याचे व्रत केले जाते. शिवपूजन करून प्रत्येक सोमवारी क्रमशः तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू प्रत्येकी एक मूठ शिवाला अर्पण केले जाते.
३. श्रावणी शनिवार
श्रावण मासातील शिव व्रतात सोमवारप्रमाणेच शनिवाराला, तसेच शिव उपासनेसह नरसिंह, पिंपळ, मारुति आणि शनिदेव यांच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे; म्हणून भाविक श्रावण मासात सोमवारप्रमाणेच शनिवारीही व्रत-उपवास करतात.
४. आदित्य व्रत
या व्रतात सूर्याची उपासना केली जाते. हे व्रत श्रावण ते माघ असे ६ मासांचे आहे. प्रत्येक रविवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नानादी नित्य कर्म करून मौनाने सूर्याची उपासना केली जाते. ६ मास शक्य नसेल, तर किमान श्रावण मासात जेवढे रविवार येतील, त्या दिवशी सूर्याची उपासना करावी. माघ शुक्ल ७, म्हणजेच रथसप्तमीस या व्रताचे उद्यापन करावे.
५. मंगळागौरी व्रत
‘स्त्रियांना अखंड सौभाग्य, पुत्र संपदा लाभावी’, याकरता हे व्रत करतात. स्त्रिया विवाहानंतर या व्रतास आरंभ करतात. हे व्रत सातत्याने ५ वर्षे केले जाते. त्यानंतर या व्रताचे उद्यापन केले जाते. या व्रतात शिव-पार्वतीची उपासना केली जाते. रात्री जागरण केले जाते.
६. शाकदान दधी व्रत
चातुर्मासात घेतलेल्या शाक (भाजी) व्रताची सांगता आणि दही व्रताचा आरंभ श्रावण शुक्ल १२ ला (द्वादशीला) केला जातो.
७. वरदलक्ष्मी व्रत
यामध्ये महालक्ष्मीची आराधना केली जाते. श्रावण पौर्णिमेच्या अगोदर येणार्या शुक्रवारी हे व्रत केले जाते. या व्रताने अलक्ष्मीचा नाश होऊन दशविध सुलक्ष्मीची प्राप्ती होते.
८. नागपंचमी
श्रावण शुक्ल पंचमीला ‘नागपंचमी’ म्हणतात. या दिवशी भिंतीवर काढलेल्या नागांची किंवा कुलाचाराप्रमाणे नागदेवतेची पूजा करतात. नागदेवता ही धनाची रक्षक आहे. नागदेवतेला लाह्या, दुधाचा नैवेद्य दाखवून संपत्ती रक्षणाची प्रार्थना केली जाते.
९. श्रावणी
चारही वर्णांकरता म्हणजेच ब्राह्मणांना श्रावणी, क्षत्रियांना दसरा (शस्त्रपूजन), वैश्यांना दिवाळी (वहीपूजन) आणि शूद्रांना होळी असे काही विशेष सण सांगितले आहेत.
९ अ. श्रावणी : ही ब्राह्मणांची विद्या सतेज रहाण्याकरता आणि दान प्रतिग्रहामुळे प्राप्त झालेले मालीन्य दूर होण्याकरता केली जाते. ‘केवळ पूजनाचा व्यवसाय करणार्या ब्राह्मणांसाठीच ही श्रावणी आहे’, असा अपसमज आज पहावयास मिळतो. खरे तर ‘वेदाध्ययन करणे आणि त्या ज्ञानाच्या साहाय्याने समाजाला मार्गदर्शन करणे’, हे ब्राह्मणांचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यापासून विन्मुख झालेल्या ब्राह्मणांनाही श्रावणीची नितांत आवश्यकता आहे. श्रावणीद्वारे वर्षभर होणार्या पातकांपासून मुक्ती मिळते. अशी ही श्रावणी श्रावण शुक्ल ५, श्रावण पौर्णिमा, भाद्रपद शुक्ल १२ किंवा भाद्रपद शुक्ल १५ या मुहूर्तावर केली जाते.
१०. रक्षाबंधन
श्रावण पौर्णिमेला ‘श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन, राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा’, असे म्हणतात. कोकणात या दिवशी समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. मासेमारीसाठी जाणार्या आपल्या धन्याच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. भावाने बहिणीचे रक्षण करावे; म्हणून बहीण भावाच्या उजव्या हातात रक्षा (राखी) बांधते.
११. श्रीकृष्ण जन्माष्टमी
‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥
– श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय ४, श्लोक ८
(अर्थ : सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी आणि धर्मस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात पुनःपुन्हा अवतार घेतो.), अशी ग्वाही देणार्या महाविष्णूने विशेष असे दशावतार धारण केले आहेत. यात श्रीराम आणि श्रीकृष्ण अधिक लोकप्रिय आहेत. प्रभु श्री रामचंद्रांचा जन्म चैत्र शुक्ल ९ या तिथीला माध्यान्हकाळी, तर गोपाळकृष्णाचा जन्म श्रावण कृष्ण ८ या तिथीला मध्यरात्री झाला आहे. संसारातील आचार पालन शिकावे प्रभु श्री रामचंद्रांकडून, तर राष्ट्र-धर्म श्रीकृष्णाकडून शिकावा. अशा धर्मावतार भगवान गोपाळकृष्णांचा जन्मोत्सव म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी होय. जन्मोत्सवाच्या दुसर्या दिवशी श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण म्हणून ‘दहीहंडी’, ‘गोपाळकाला’ केला जातो.
१२. पोळा
कृषीप्रधान असणार्या भारत वर्षात शेती उपयोगी महत्त्वाचा प्राणी बैल होय. अविरत श्रम करणार्या या नंदीबैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्याचा सन्मान करण्याचा, त्याला गोड धोड खाऊ घालण्याचा विशेष दिवस, म्हणजे ‘बैलपोळा’ होय. नंदीबैल हा केवळ प्राणी नसून तो साक्षात् धर्म आहे. गोमातेच्या गात्रागात्रात सर्व देवीदेवता निवास करतात; म्हणून गोमाता पूजनीय, तर नंदीबैल हा साक्षात् धर्म होय. धर्माने कठोर तपाचरण करून शिवाला प्रसन्न करून घेतले आणि ‘माझा स्वीकार करा’, अशी विनंती केली. शिवाने प्रसन्न होऊन धर्माला स्वतःचे वाहन बनवले, ते वाहन म्हणजे नंदीबैल. त्या धर्मस्वरूप नंदीबैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा होय.
– जगद़्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज
(साभार : ‘धर्मक्षेत्र नाणीजधाम’, ऑगस्ट २०११)