‘आळंदी देवस्थान’चे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांची माहिती
पुणे – शालेय मुलांना योग्य वयात संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षणाच्या समवेत संत साहित्याचा अभ्यास घेणारा ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ हा उपक्रम आळंदीमध्ये ३ वर्षांपासून चालू आहे. आता हा उपक्रम ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’च्या माध्यमातून राज्यात राबवण्यात येत आहे. या उपक्रमात राज्यातील शिक्षण संस्था सहभागी होत आहेत. या उपक्रमातून संत साहित्याचा प्रचार-प्रसार शालेय मुलांच्या माध्यमातून होत आहे. भावी पिढी संस्कारक्षम व्हावी, तसेच त्यांना संत विचारांच्या अध्यात्माची ओळख, आवड निर्माण व्हावी, हे ध्येय घेऊन हा कार्यक्रम हाती घेतला असल्याचे, ‘आळंदी देवस्थान’च्या वतीने प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.
आळंदीतील ‘संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती’च्या संकल्पनेतून आणि ‘श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थे’तील पदाधिकारी, शिक्षक यांच्या माध्यमातून हा प्रकल्प सिद्ध करण्यात आला आहे. गेल्या ३ वर्षांपासून येथील ज्ञानेश्वर विद्यालयात ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ उपक्रम यशस्वीपणे चालू आहे. जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांसह अनेक मराठी शाळांकडून प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील आणि शहरातील ३५ शाळांमध्ये या उपक्रमास प्रारंभ झालेला आहे. सहभागी शाळांना श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चित्राची प्रतिमा, सार्थ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या पारायण प्रति, हरिपाठ, पुस्तके आणि ह.भ.प. सुभाष महाराज गेठे यांनी हरिपाठाचे विवेचन केलेला ‘पेनड्राईव्ह’ दिला जातो.
‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमास पालकांतून मोठा प्रतिसाद मिळाला असून मुलांचा सहभागसुद्धा वाढला आहे. शालेय अभ्यासक्रमा सोबत संत विचारांचा अभ्यास उपलब्ध करून देणारा हा ‘आध्यात्मिक आळंदी पॅटर्न’ म्हणून सर्वत्र ओळखला जाणार आहे. या उपक्रमाचे अनेक नामवंतांकडून कौतुक होत आहे. यासाठी ह.भ.प. सुभाष गेठे, उमेश बागडे, भागवत साळुंखे, श्रीधर घुंडरे हे शिक्षक विद्यार्थ्यांना सांप्रदायिक ज्ञान देण्याचे काम करीत आहेत. चौथी ते सहावीपर्यंत हरिपाठ पाठांतर आणि सातवी-आठवीसाठी हरिपाठ अर्थ विवेचन, ज्ञानेश्वरीविषयी शिक्षण दिले जाते.