पणजी, १० ऑगस्ट – लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात कठोर कायदे करण्याच्या मागणीवरून ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’च्या अंतर्गत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना पणजी येथे शनिवार, १२ ऑगस्ट या दिवशी दुपारी ४ वाजता ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी दिली. पत्रकार परिषदेला सर्वश्री जयेश थळी, गोमंतक मंदिर महासंघ; नितीन फळदेसाई, राष्ट्रीय बजरंग दल; श्री. सुभाष कुशवा, उत्तर गोवा उपाध्यक्ष, राष्ट्रीय हिंदू वाहिनी संघ आणि सौ. शुभा सावंत, सनातन संस्था यांची उपस्थिती होती.
केंद्रशासनाने राज्यसभेत गोव्यातून वर्ष २०१९ ते २०२१ या २ वर्षांच्या कालावधीत १ सहस्र ४७१ महिला आणि ७९ मुले गायब झाल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे गोवा सरकारने मागील साडेतीन वर्षांत गोव्यातून ८२९ महिला आणि मुले गायब झाल्याचे आणि यातील १३४ अजूनही गायब असल्याचे म्हटले आहे. ही एक गंभीर घटना आहे. गोव्यात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणेही वाढत आहेत. त्याचप्रमाणे गोव्यात धर्मांतराच्या अनेक घटना गावागावात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांना आळा घालणे आणि धर्मांतर रोखणे यांसाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे. यासाठी ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.
मोर्च्याला १२ ऑगस्ट या दिवशी दुपारी ४ वाजता आझाद मैदान, पणजी येथून प्रारंभ होऊन तो पुढे डॉन बॉस्को सर्कल, जुने शिक्षण खाते, कॅफे आराम आणि शेवटी आझाद मैदानात मोर्च्याची सांगता होणार आहे. या मोर्च्यामध्ये समस्त हिंदूंनी जातपात, संप्रदाय आदी बिरुदावली बाजूला सारून हिंदु या नात्याने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’च्या माध्यमातून करण्यात येत आहे.