देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे श्री. अरुण डोंगरे यांची डिसेंबर २०२२ मध्ये हृदयाची मोठी शस्त्रक्रिया झाली. या कठीण काळात श्री. डोंगरे, तसेच त्यांचे कुटुंबीय यांना आलेल्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तसेच सद़्गुरु, संत अन् साधक यांनी केलेल्या साहाय्याविषयी त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता, याविषयी ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत. १० ऑगस्ट २०२३ या दिवशी आपण श्री. अरुण डोंगरे यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पाहिली. आज आपण त्यांच्या पत्नी सौ. मेघना डोंगरे यांना जाणवलेली सूत्रे पाहूया.
१. यजमानांच्या हृदयाच्या आजारासंदर्भात मिळालेली पूर्वसूचना
‘मला यजमानांच्या हृदयाच्या आजाराविषयी काहीच ठाऊक नसतांना २ – ३ मास आधीपासून रात्री अधून-मधून अकस्मात् जाग येत असे. तेव्हा ‘यजमानांचा श्वास चालू आहे ना’, हे मी हात लावून पहात असे. त्या वेळी ‘मी असे का करत आहे ?’, याचे कारण मला उमगले नाही. पुढे नोव्हेंबर मासात त्यांच्या हृदयाच्या चाचण्या झाल्यावर मला माझ्या या कृतीमागील कारणाचा उलगडा झाला.
२. यजमानांच्या शस्त्रक्रियेविषयी समजल्यावर स्थिर रहाता येणे
यजमानांच्या हृदयाची ‘अँजिओग्राफी’ (टीप १) झाल्यावर त्यांना वार्डमध्ये आणण्यात आले. त्यांच्या समवेत असणार्या एका वरिष्ठ स्त्री डॉक्टरला मी विचारले असता तिने मला त्यांची ‘बायपास सर्जरी’ (टीप २) करावी लागेल, हे सांगितले. ते ऐकल्यावरही मी स्थिर राहू शकले. मनात कुठेही भावना उफाळून आल्या नाहीत, ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचीच कृपा !
टीप १ : ‘अँजिओग्राफी’ म्हणजे हृदयातील रक्तवाहिन्यांतील अडथळे शोधण्याची पद्धत
टीप २ : शस्त्रक्रिया करून हृदयाच्या रक्तवाहिन्यांना येणार्या अडथळ्याच्या पुढे पर्यायी रक्तवाहिन्या जोडून पुरेसे रक्त पुढील भागाला पुरवण्याची व्यवस्था करणे’, याला ‘बायपास सर्जरी’ असे म्हणतात.
३. ‘यजमानांची शस्त्रक्रिया ठरल्यावर ते स्थिर आणि आनंदी होते. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवसापर्यंत ते प्रतिदिन व्यष्टी लिखाण करत होते.’
४. प्रतिकूल वातावरणातही मंत्रजप करता येणे
यजमान रुग्णालयात असतांना अतीदक्षता विभागाच्या बाहेर मी, माझी नणंद श्रीमती नीलिमा माणके आणि माझा मुलगा विक्रम दिवसभर रज-तमात्मक वातावरणात थांबलेलो असायचो. तेथे प्रतिदिन किमान ३ – ४ रुग्ण मृत्यू पावायचे. त्यांच्या नातेवाइकांचा आक्रोश चालू असायचा; पण याही वातावरणात गुरुकृपेने आम्हाला यजमानांसाठी सांगण्यात आलेले मंत्रजप शांतपणे करता यायचे.
५. सुरक्षारक्षकाशी नम्रतेने बोलण्याचा प्रयत्न करणे आणि नंतर त्याने चांगली वागणूक देणे
यजमान अतीदक्षता विभागात असल्याने त्यांना जेवण देण्यासाठी विभागात जातांना तेथील सुरक्षारक्षक कधी-कधी जाऊ द्यायचा नाही. पुष्कळ आरडाओरड करायचा; पण हे सर्व आम्हाला शांतपणे स्वीकारता यायचे. आम्ही त्याच्याशी वाद न घालता नम्रतेने बोलायचो. हे गुरुदेवांनीच शिकवले आहे. यामुळे रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ (घरी जाण्याची अनुमती) मिळाल्यानंतर जेव्हा-जेव्हा आम्ही तपासणीसाठी रुग्णालयात जात असू, तेव्हा सर्व सुरक्षारक्षक आमच्याशी चांगले वागायचे आणि यजमानांची आपुलकीने चौकशी करायचे.
६. ‘गुरुदेवांचा साधक’ म्हणून यजमानांची सेवा करत असल्याचा भाव ठेवणे
जेव्हा यजमानांची शस्त्रक्रिया करायचे ठरले, तेव्हा ‘यांची सेवा करतांना आपण काय भाव ठेवायचा ?’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा देवाने सुचवले, ‘यजमानांची ‘पतीसेवा’ या भावाने सेवा करण्याऐवजी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या या साधकाने आम्हा सर्वांना साधनेत आणले. आम्हाला साधनेत साहाय्य केले. ते जीवनमुक्त व्हायला हवेत आणि यासाठी त्यांना साहाय्य करणे, त्यांची संपूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हा ‘एक साधक’ म्हणून भाव ठेवायला हवा.’ त्यानुसार भाव ठेवून मला यजमानांची सर्व काळजी घेता आली.
७. आश्रमातील साधकांची कुटुंबभावना अनुभवणे
यजमानांच्या शस्त्रक्रियेच्या कालावधीत सर्व देवद आश्रम आमच्या पाठीशी उभा राहिला. यजमानांना रुग्णालयात वेळेत न्याहारी आणि महाप्रसाद पोचवण्यासाठी वाहन सेवेतील साधक अन् यजमानांसमवेत सेवा करणारे वयस्कर सहसाधक पुष्कळ प्रयत्न करायचे. आश्रमातील कुटुंबभावना पदोपदी अनुभवायला यायची.’
(क्रमशः)
– सौ. मेघना अरुण डोंगरे (वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |