दैनंदिन जीवनात स्पर्धा, ओढाताण, नियोजनाचा अभाव, अपेक्षा, असमाधानी वृत्ती, स्वार्थांधता, नैराश्य, भावनाशीलता, तुलना करणे, प्रतिमा दुखावणे, प्रतिमा जपणे ईर्ष्या, मत्सर आदी दुर्गुणांमुळे अनावश्यक आणि नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढते. परिणामस्वरूप अनेकांचे मानसिक संतुलन बिघडते. आज भारतासारख्या विविध साधनामार्गांचे भांडार असलेल्या, तसेच विश्वाला योगसाधनेची देणगी देणार्या राष्ट्रातील नागरिकांना मात्र दुर्दैवाने मानसिक आरोग्याची चिंता आता मोठ्या प्रमाणात भेडसावू लागली आहे. सध्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त रहाण्याकडे कल (ट्रेंड) वाढला आहे. त्यासाठी अनेक जण व्यायामशाळेत जाणे, आहारतज्ञांकडून सल्ला घेऊन त्याप्रमाणे आहार करणे अशा प्रकारे अनेक प्रयत्न करतात; पण हा सारा खटाटोप ‘आरोग्य चांगले हवे’, यापेक्षा ‘सुंदर दिसले पाहिजे’, यासाठी अधिक असतो. केस काळे करणे, सौंदर्यालयात जाणे, प्रतिदिन पालटणार्या नवरूढींप्रमाणे (फॅशनप्रमाणे) वेश आणि केश भूषा करणे आदी गोष्टींचा सध्या अतिरेक झाला आहे. तसे न केल्यास समाजात मागासलेले समजले जाते. ‘आपले व्यक्तीमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी या गोष्टी करणे आवश्यक आहे’, असे बहुतेकांना वाटते; परंतु या बाह्य आणि कृत्रिम शारीरिक सौंदर्यापेक्षा देवाने दिलेले नैसर्गिक सौंदर्य हेच अधिक ‘सात्त्विक’ आणि म्हणून ते अधिक ‘सुंदर’ असते, हे समजून घेतले पाहिजे.
मन आणि अंतःकरण सुंदर अन् निर्मळ असेल, तर कुणीही अधिक सुंदर दिसतो. इतरांना आकर्षित करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या चिरतरुण व्हायचे नाही, तर ‘देवासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी सक्षम व्यक्तीमत्त्व निर्माण करायचे आहे’, असा विचार असायला हवा. वय वाढलेल्यांनी तरुण दिसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा वृत्ती अंतर्मुख करून ‘देवाला आवडेल’ असे होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शारीरिक सौंदर्य जपतांना वृत्ती बहिर्मुख होते. त्यापेक्षा मनाचे सौंदर्य जोपासण्याचा प्रयत्न केला, ते निर्मळ आणि दोषविरहित केले, तर आपण अधिक सुंदर दिसणार आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. शरीर आणि मन सुंदर करण्यासाठी स्वतःतील दोष अन् अहं न्यून करून भगवंताची उपासना केली पाहिजे, तसेच दैनंदिन उपासना केल्यामुळे देवाचे साहाय्य आणि त्यामुळे प्राप्त होणारी मानसिक स्थिरता मिळते. शेवटी जगद़्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।’ हे लक्षात ठेवले पाहिजे !
– श्री. जयेश बोरसे, पुणे