(म्हणे) ‘गोव्यात ‘मणीपूर’सारखी स्थिती निर्माण होऊ शकते !’ – ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेत लेख

पोर्तुगीजधार्जिण्या चर्चसंस्थेकडून गोव्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

पणजी – गोव्यात पुढे ‘मणीपूर’सारखी (सध्या मणीपूर येथे चालू असलेल्या हिंसाचारासारखी) स्थिती निर्माण होणार आहे, असा सामाजात धार्मिक तेढ निर्माण करणारा लेख ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेत (१ ते १५ ऑगस्ट) प्रसिद्ध झाला आहे. ‘जागतिक युवा दिना’साठी समर्पित केलेल्या या पाक्षिकाच्या संपादकीय विभागाचे सदस्य असलेले डॉ. एफ्.ई. नोरोन्हा यांनी हा लेख लिहिला आहे.

डॉ. एफ्.ई. नोरोन्हा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बेतुल येथील ऐतिहासिक किल्ल्यावरून पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर डॉ. नोरोन्हा या लेखात म्हणतात, ‘‘गोव्यात पोर्तुगीज संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चर्च नष्ट केले जाऊ शकतात, तसेच पाद्रयांना आणि तुम्हाला (ख्रिस्त्यांना) मारहाण केली जाऊ शकते. तुम्ही (ख्रिस्ती) संघटित होण्याची आवश्यकता आहे. वाचण्यासाठी प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे. आज तुम्हाला वाचवण्यासाठी जनमत कौलाचे जनक डॉ. जॅक सिक्वेरा येणार नाहीत. (गोवा महाराष्ट्र राज्याला जोडला जाऊ नये, यासाठी जनमत कौलाचे यशस्वीपणे आंदोलन छेडलेले डॉ. जॅक सिक्वेरा) भारताने आज संघटित होणे आवश्यक आहे.’’

संपादकीय भूमिका

असे चिथावणीखोर लिखाण करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा लेख प्रसिद्ध करणार्‍या ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेची गंभीरतेने नोंद घेऊन गोवा सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, असेच शांतीप्रिय जनतेला वाटते !