तुर्भे येथील अवैध वृक्षतोडीकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष !

झाडे तोडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी !

नवी मुंबई, ५ ऑगस्ट (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अवैधरित्या वृक्षतोड होते. येथील आय.सी.एल्. शाळेजवळील बस थांब्याच्या लगतचे झाड खोडापासून तोडण्यात आले. राजरोसपणे झाडे तोडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे. (अशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक) अधिकार्‍यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

१. विभाग अधिकारी भरत धांडे यांनी झाड कुणी तोडले, याविषयी माहिती नसल्याचे सांगितले. ‘चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल’, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली.

२. ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत वृक्षारोपण करण्यासाठी कोट्यवधी रुपये उधळले जातात. शहरातील उद्याने हिरवीगार दिसावीत, यासाठी उद्यानांचे संवर्धन करणे, झाडांची निगा राखणे आदी कामे केली जातात. जनतेच्या पैशांतून वाढवलेली झाडे तोडणे या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे करदाते नाराज आहेत.

३. ‘या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी. तसेच उद्यानांची योग्य प्रकारे निगा न राखणार्‍या किंवा अवैधपणे वृक्षतोड करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.