कल्याण येथे रस्त्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न करणारा अटकेत !

ठाणे, ३ ऑगस्ट (वार्ता.) – कल्याण पूर्व परिसरात शिकवणीवरून घरी परतणार्‍या १४ वर्षीय विद्यार्थिनीवर सराईत गुन्हेगाराने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून विशाल गवळी या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर यापूर्वीही बलात्कारासह इतर गंभीर गुन्हे नोंद असल्याचे पोलीस अन्वेषणातून समोर आले आहे. (कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच गुन्हेगार असे गुन्हे पुनःपुन्हा करण्याचे धाडस करत आहेत. – संपादक)

पीडित अल्पवयीन मुलगी खासगी शिकवणीवर्गातून घरी परतत होती. त्या वेळी आरोपीने तिचा पाठलाग केला. भररस्त्यात गाठून तिला रस्त्याच्या कडेला नेले. तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेला प्रकार पाहून ती भयभीत झाली; मात्र तिने धाडस करत त्या नराधमाचा प्रतिकार केला. त्याच्या तावडीतून सुटका करून तिने घर गाठले आणि तक्रार प्रविष्ट केली. याप्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

गुन्हेगारांवर वचक बसेल, अशी कारवाई पोलिसांनी केली, तरच असे प्रकार रोखता येतील !