शालेय शिक्षण आणि मराठीभाषा मंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन !
मुंबई – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवण्यास शासनाने कोणतीही बंदी केलेली नाही; मात्र या मूर्तींमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये; म्हणून कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात येईल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत गिरगावला मूर्तीविसर्जन होते; मात्र तिथेही यंदा कृत्रिम तलाव बनवण्यात येतील. ‘गवत, कोंडा, तसेच अन्य गोष्टींपासून मूर्ती सिद्ध करता येते का ?’ याचा आम्ही अभ्यास करत आहोत. ‘प्लास्टरच्या मूर्तीमध्ये जे रंग वापरण्यात येतात ते कोणते वापरण्यात यावेत ?’, या संदर्भात आम्ही निर्देश दिले आहेत. याविषयी नागपूर न्यायालयात सुनावणी चालू असल्याने अधिक बोलणे सयुक्तिक होणार नाही, असे उत्तर राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठीभाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी ‘प्लास्टर ऑफ परिस’च्या श्री गणेशमूर्तीच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या लक्षवेधीवर बोलत होते.
या संदर्भात जयंत पाटील म्हणाले, ‘‘केंद्रशासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घातली असल्याने राज्यातील मुंबई, पुणे, पेण, पनवेल, हमरापूर अशा विविध ठिकाणी असणार्या मूर्तीकारांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. यामुळे राज्यातील ३० लाख मूर्तीकारांच्या उत्पन्नावर गदा येईल. या मूर्तींची ७० ते ८० सहस्र कोटी रुपयांची उलाढाल होते. एकट्या हमरापूर येथे २ लाख १७ सहस्र लोक यावर अवलंबून आहेत. शासन १२ फुटी प्लास्टरच्या मूर्तींना अनुमती देते; मात्र लहान मूर्तींना अनुमती देत नाही, असे का ? त्यामुळे यंदा प्लास्टरच्या मूर्तीवर बंदी आणू नये. तेलंगाणा, गुजरात, भाग्यनगर येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवल्या जातात, मग महाराष्ट्रातच बंदी का ?’’
कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्ती हानीकारक आणि प्रदूषण करणार्या !
प्राप्त झालेले विविध अहवाला आणि अभ्यास यांद्वारे कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्ती हानीकारक आणि प्रदूषण करणार्या आहेत हेच समोर आले आहे. असे असतांना प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देते, हे आश्चर्यकारक आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. या संदर्भात सदस्य अनिकेत तटकरे म्हणाले, ‘‘कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्ती बनवू नये असा ‘नॅशनल केमिकल लॅब’चा सर्व्हे असतांना, तसेच सर्वोच्च न्यायालयाचाही आदेश असतांना आपण त्या करण्यास प्रोत्साहन देतो ?’’ |