१४ जुलै १९०९ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘बॅरिस्टर’ पदवी देण्याचे नाकारण्यात आले, त्या निमित्ताने…
१४ जुलै १९०९ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रज सरकारकडून ‘बॅरिस्टर’ पदवी देण्याचे नाकारण्यात आले. त्याचे औचित्य साधून त्याविषयीच्या उपलब्ध असलेल्या माहितीला अनुसरून सावरकरांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांची माहिती ‘भारतमातेचा बॅरिस्टर’ या लेखस्वरूपात येथे मांडत आहे.
(भाग १)
१. राष्ट्रभक्तीला सुरुंग लावण्यासाठी इंग्रजांनी रचले कटकारस्थान !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाढत्या राजकीय चळवळींनी त्रस्त झालेल्या इंग्रज सरकारने भारत भवनातील (‘इंडिया हाऊस’मधील) राष्ट्रभक्तीला सुरुंग लावण्यासाठी कटकारस्थान करण्याचा घाट घातला. त्यासाठी ब्रिटीश सरकारने मुंबई सरकारकडे पांढरपेशा मराठी माणसाची मागणी केली. ब्रिटीश सरकारच्या मागणीनुसार मुंबई सरकारने कीर्तीकर नावाच्या ३० वर्षीय तरुणाची निवड केली. त्याला ६ भाषा अवगत होत्या.
२. क्रांतीकारकांची माहिती समजण्यासाठी इंग्रजांनी पाठवला घरभेदी !
२ अ. घरभेद्याने ‘इंडिया हाऊस’मध्ये प्रवेश मिळवला ! : लंडनमध्ये रहाणारे हिंदुस्थानातील क्रांतीकारक आपल्या मातृभाषेत अथवा हिंदी भाषेत बोलत असत. त्यांच्या मागावर असलेल्या इंग्रजांच्या हेरांना क्रांतीकारकांची मातृभाषा, तसेच हिंदी भाषाही अवगत नव्हती. त्यामुळे ‘हे क्रांतीकारक तरुण आपसांत काय बोलतात ?’, याचा आशयही हेरांना कळत नव्हता. त्यामुळे मुंबई सरकारने एका घरभेद्याला लंडनला पाठवले. त्यासाठी त्याला सरकारी सेवेतून एक वर्षाची वेतनासह सुट्टी दिली. इंग्रज सरकारच्या योजनेप्रमाणे कीर्तीकर लंडनला दंतवैद्यकीचा अभ्यास करण्यासाठी आला. त्याने लंडनच्या एका रुग्णालयात अभ्यास करण्यासाठी नाव नोंदवले. लंडनला आल्यावर त्याने मे १९०९ मध्ये ‘इंडिया हाऊस’मध्ये रहाण्यासाठी हरिश्चंद्र कोरेगावकर या देशभक्त क्रांतीकारकाच्या ओळखीने अनुमती मिळवली. हरिश्चंद्राने कीर्तीकरची माहिती सावरकरांना अत्यंत थोडक्यात सांगितली. सावरकरांनी त्याला ‘भारत भवना’त रहाण्याची अनुमती दिली. त्या वेळी सावरकरांकडे ‘भारत भवना’च्या व्यवस्थापनाचे दायित्व होते.
२ आ. घरभेद्याच्या वर्तनाकडे सावरकरांनी प्रारंभी दुर्लक्ष केले ! : प्रारंभीचे काही दिवस कीर्तीकर नियमितपणे रुग्णालयात शिक्षणासाठी जात होता; पण काही दिवसांनी तो गादीवरच पडून राहू लागला. शिकण्यासाठी रुग्णालयात जाण्यास तो टंगळमंगळ करायचा. नंतर तो विलंबाने ‘भारत भवना’त येऊ लागला. त्याने तेथील एका मोलकरणीशी अनैतिक संबंधही ठेवले. ही गोष्ट तेथील डॉ. राजन यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याकडे सावरकरांचे लक्ष वेधले; पण त्यांनी दुर्लक्ष केले; कारण ‘श्रीमंत कुटुंबातील काही तरुण मुले त्या वयात असा व्रात्यपणा करतात’, असे सावरकर यांचे मत होते.
२ इ. संशयापोटी घरभेद्याची माहिती काढली ! : काही काळाने घरभेदी कीर्तीकरने सावरकरांसमवेत परिचय वाढवला. त्यांच्या भाषणांनाही तो उपस्थित राहू लागला. त्यांची भाषणे तन्मयतेने ऐकू लागला. एवढेच नव्हे, तर तोही आपल्या भाषणातून जहाल विचार मांडू लागला. त्याने ‘फ्री इंडिया सोसायटी’ या संस्थेला प्रतिमास एक पौंडाची (ब्रिटीश चलन) वर्गणी देण्यास प्रारंभ केला. काही दिवसांनंतर तो रात्री-बेरात्री भारत भवनाच्या बाहेरच राहू लागला. सावरकर यांना त्याच्या हालचाली आणि वर्तन यांचा संशय आल्याने त्यांनी डॉ. राजन यांना त्याची माहिती काढण्यास सांगितले. सावरकरांच्या सूचनेप्रमाणे डॉ. राजन यांनी कीर्तीकरची माहिती काढली.
२ ई. घरभेद्याकडे सापडला भारत भवनातील घडामोडींचा विपर्यस्त वृत्तांत ! : कीर्तीकरविषयी सावरकर यांना सांगतांना डॉ. राजन म्हणाले, ‘‘कीर्तीकरने दंतवैद्याचे शिक्षण घेण्यासाठी स्वतःचे नाव नोंदवले होते; पण तो केवळ एकच आठवडा रुग्णालयात गेला. नंतर तो तिकडे फिरकलाही नाही. सरकारचे गुप्त अनुचर (गुप्तहेर) त्याच्या पाळतीवर असतात, असेही आढळले आहे.’’ त्याच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद असल्याचे आढळताच व्ही.व्ही.एस्. अय्यर आणि डॉ. राजन एके दिवशी तो नसतांना त्याच्या खोलीत गेले. खोलीची झडती घेतल्यावर तेथील एका पेटीत कीर्तीकरच्या हस्ताक्षरातील एक अहवाल सापडला, तो भारत भवनातील घडामोडींचा अहवाल होता; पण त्यात लिहिलेला वृत्तांत विपर्यस्त होता. अय्यर यांनी सर्व कागद स्वतःसमवेत घेतले आणि डॉ. राजन यांच्यासह ते कीर्तीकरच्या खोलीतून बाहेर पडले.
२ उ. स्कॉटलंड यार्डचा हस्तक असणार्या घरभेद्याला सुनावण्यासाठी रचलेली व्यूहरचना ! : कीर्तीकर हा स्कॉटलंड यार्डचा हस्तक असल्याचे सिद्ध झाले. व्ही.व्ही.एस्.अय्यर यांनी त्याच्याविषयीची सर्व माहिती सावरकर यांना सांगितली. यावर सावरकर आणि अय्यर यांच्यात चर्चा झाली. चर्चेनंतर अय्यर आपले मत व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘या कीर्तीकरला आपण ‘भारत भवना’तून कायमचे हाकलून देणे योग्य ठरेल.’’ त्यावर सावरकर म्हणाले, ‘‘असे करून चालणार नाही. याला इथून हाकलले, तर पोलीस त्याच्या जागी दुसरा माणूस पाठवतील. ‘आम्हाला तुझी लबाडी कळली आहे’, असे आपण त्याला सांगूया आणि त्याला येथेच रहाण्याची अनुमती देऊया. आतापर्यंत तो पोलिसांसाठी काम करत होता. आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोचवत होता. आता आपण सांगू ती माहिती तो पोलिसांपर्यंत पोचवेल आणि पोलिसांकडील सगळी माहिती तो आपल्याला येऊन सांगेल. आपण असे करणे, हा सर्व दृष्टीने एक उत्तम उपाय आहे.’’
२ ऊ. रात्रीच्या वेळेत घरभेद्याला सुनावले ! : दुसर्या दिवशी मध्यरात्री सावरकर आणि व्ही.व्ही.एस्.अय्यर यांंनी कीर्तीकरला भेटण्याचे ठरवले. सावरकर यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. अर्धवट झोपेत असलेल्या कीर्तीकरने दरवाजा उघडला. त्याच क्षणी अय्यरांनी आपल्या पिस्तुलाची थंडगार नळी कीर्तीकरच्या कानशिलावर ठेवली. अय्यरांचा आविर्भाव आणि पिस्तुलाची थंडगार नळी यांमुळे कीर्तीकरची झोप उडाली. अय्यरांनी त्याला धक्के मारत एका खुर्चीत बसवले. अय्यरांच्या पाठोपाठ सावरकर खोलीत शिरले. त्यांनी दरवाजा बंद केला आणि आतून कडी लावली. काही क्षण काय घडत आहे, ते कीर्तीकरच्या लक्षात आले नाही. हळूहळू त्याला परिस्थितीची जाणीव झाली. तोपर्यंत सावरकरांनी दुसरी खुर्ची घेऊन ते त्याच्या समोर बसले होते. कीर्तीकरच्या कानशिलावर ठेवलेली पिस्तुलाची नळी अय्यरांनी जराही बाजूला केली नाही.
२ ए. बिंग फुटल्यावर घरभेद्याकडून सावरकर यांची क्षमायाचना ! : आता सावरकर त्याच्याशी शांतपणे बोलू लागले, ‘‘कीर्तीकर, तू येथे का आणि कशासाठी आला आहेस ? ते आम्हाला कळले आहे. तू कितीही कांगावा केला, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुझ्या फितुरीचे अस्सल पुरावे आमच्याकडे आहेत.’’ यानंतर सावरकर यांनी त्याच्याच हस्ताक्षरातील त्याने लिहिलेला अहवाल त्याला दाखवला. तो पहाताच कीर्तीकर गर्भगळीत झाला. त्याने सर्व गोष्टी मान्य केल्या आणि सावरकर यांचे पाय धरून क्षमा मागितली.
२ ऐ. सावरकरांच्या सर्व अटी घरभेद्याकडून मान्य ! : सावरकर त्याला शांतपणे म्हणाले, ‘‘तू ‘स्कॉटलंड यार्ड’ला पूर्वीप्रमाणेच ‘भारत भवना’तील घडामोडींचे अहवाल पाठवायचे आहेस; पण ते अहवाल स्कॉटलंड यार्डला पाठवण्यापूर्वी अहवालातील प्रत्येक कागद अय्यरांना दाखवायचा. तू गडबड करण्याचा प्रयत्न केला, तर मात्र तू जिवंत रहाशील, याची निश्चिती आम्ही देऊ शकत नाही.’’ घाबरलेला कीर्तीकर गयावया करत सावरकर यांना म्हणाला, ‘‘तुम्ही सांगाल, तसेच मी वागीन; पण मला मारू नका.’’ सावरकर म्हणाले, ‘‘माझे अजून पूर्ण सांगून झालेले नाही. ‘फ्री इंडिया सोसायटी’ला तू आतापर्यंत जी प्रतिमास वर्गणी देत होतास, त्याच्या दुप्पट वर्गणी तुला द्यावी लागेल.’’ सावरकर यांच्या सर्व अटी कीर्तीकरने मान्य केल्या. त्यानंतर तो गोगलगाय बनून राहिला. अशा प्रकारे इंग्रजांनी देशभक्त क्रांतीकारकांच्या विरोधात केलेला कट सावरकर यांनी इंग्रजांच्या लक्षात येऊ न देता उद़्ध्वस्त केला. ‘इंडिया हाऊस’मध्ये ‘फ्री इंडिया सोसायटी’ची सभा असली की, सावरकर कीर्तीकरला बाहेर टेहळणी करण्यासाठी उभे रहाण्यास सांगत. त्याला सभेतील भाषणे कळू नयेत, हाच त्यांचा यामागील हेतू होता.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२५.२.२०२३)