आज १३ जुलै या दिवशी भक्तीसत्संगरूपी दिव्य सत्संग शृंखलेतील ३०० वा सत्संग होत आहे. त्या निमित्ताने …
साक्षात् विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने ५ ऑक्टोबर २०१६ (आश्विन शुक्ल चतुर्थी ) या तिथीपासून भावसत्संगांना आरंभ झाला. तेव्हापासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांना भाववृद्धीसाठी मार्गदर्शन करत आहेत. सनातनच्या सर्व साधकांमध्ये भाववृद्धी होण्यासाठी चालू झालेल्या या सत्संगांचा प्रवास आता भक्तीमय भक्तीसत्संगापर्यंत झाला आहे. साधकाला त्याच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगाकडे पहाण्याची भावदृष्टी प्रदान करणार्या, त्यांच्यामध्ये अंतर्बाह्य पालट करणार्या आणि त्यांना भक्तीसागरात डुंबवणार्या या भक्तीसत्संगरूपी दिव्य सत्संग शृंखलेतील ३०० वा सत्संग १३ जुलै २०२३ या दिवशी होत आहे. भक्तीसत्संगाच्या या त्रिशतकपूर्तीच्या निमित्ताने आज आपण या सत्संगाच्या माध्यमातून साधकांना आलेल्या अनुभूती येथे पाहूया.
१. भक्तीसत्संग ऐकल्यानंतर ‘वातावरणातील हवा (वायू) परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्पर्श करत आहे आणि त्यांच्या उच्छ्वासातून चैतन्य मिळत आहे’, असे जाणवणे
‘एका भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘पंचतत्त्वांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पूजन कसे केले ?’, याविषयी सांगितले. हा भक्तीसत्संग ऐकल्यानंतर मला जाणवले, ‘वातावरणातील हवा (वायू) गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) स्पर्श करत येत आहे. त्यांच्या उच्छ्वासातून आम्हाला चैतन्य मिळत आहे. सेवाकेंद्रात सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आले आहेत. वातावरणातील हवा (वायू) त्यांना स्पर्श करून आम्हाला चैतन्य देत आहे.’
२. मी पाण्याला स्पर्श करते, तेव्हा ‘ते पाणी गुरुदेवांच्या श्रीचरणांनाच स्पर्श करून येत आहे’, असे मला जाणवते.
३. गुरुदेव आणि सद़्गुरु पिंगळेकाका यांचे दर्शन झाल्यावर कृतज्ञता व्यक्त होणे
भक्तीसत्संगात लावण्यात आलेल्या एका भजनात सांगितले होते, ‘जेव्हा आपल्याला पुण्यकर्माचे फळ मिळते, तेव्हा आपल्याला दत्तगुरूंचे दर्शन होते.’ मला गुरुदेव आणि सद़्गुरु पिंगळेकाका यांचे दर्शन झाल्यावर ‘माझे केवढे भाग्य आहे ! माझ्यावर गुरुदेवांची किती कृपा आहे !’, असे वाटले अन् त्याबद्दल माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होऊ लागली.
– कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र, देहली.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |