पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे सरपंचांचे आश्वासन
मालवण – नुकतेच कोळंब गावाला गेले ३ मास पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. आता सातत्याने पाऊस पडत असूनही जलवाहिनी आणि पंप यांमध्ये बिघाड झाल्याने पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नुकतेच ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच आणि उपसरपंच यांना खडसावले. ‘पाऊस पडूनही गावात पाणी मिळत नसेल, तर ग्रामस्थांनी काय करायचे ?’, असा प्रश्न ग्रामस्थांनी या वेळी उपस्थित केला.
कोळंब हे गाव बहुतांश प्रमाणात नळपाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत पाण्याची पातळी घटल्याने आणि त्यानंतर पंपामध्ये बिघाड झाल्याने पाणीटंचाई जाणवत होती. आता पाऊस पडल्याने नळयोजनेच्या विहिरीलाही पाणीसाठा पुष्कळ आहे; मात्र जलवाहिनी जुनी झाल्याने वरचेवर फुटत असल्याने आता पाणीपुरवठा करण्यात अडचण येत असल्याचे समजते. याविषयी सरपंच सिया धुरी आणि उपसरपंच विजय नेमळेकर यांनी, ‘जलवाहिनी दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल’, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका‘निसर्गाने दिले; पण निष्क्रीयतेमुळे गमावले’, अशी स्थिती निर्माण करणारे प्रशासन ! |