भारतातील सनातन धर्माचे महत्त्व जाणणारे स्‍वामी विवेकानंद !

४ जुलै २०२३ या दिवशी स्‍वामी विवेकानंद यांचे पुण्‍यस्‍मरण आहे. त्‍या निमित्ताने…

‘स्‍वामी विवेकानंद हे लंडनमध्‍ये असतांना त्‍यांच्‍या एका इंग्रज मित्राने त्‍यांना टोमणा मारला, ‘‘चार वर्षे विलासिता (भोगवाद), झगमगाट आणि शक्‍तीने परिपूर्ण अशा या पाश्‍चिमात्‍य जगाचा अनुभव घेतल्‍यानंतर आता तुम्‍हाला तुमची मातृभूमी (भारत) कशी वाटेल ?’’ त्‍या मित्राला वाटले की, स्‍वामी विवेकानंदांच्‍या तोंडवळ्‍यावर निराशा येईल; पण या सद़्‍गुरूंच्‍या शिष्‍याने, भारतमातेच्‍या सुपुत्राने आणि धर्मधुरंधराने (स्‍वामी विवेकानंद यांनी) आपले हृदय मोकळे केले. स्‍वामी विवेकानंद म्‍हणाले, ‘‘अगोदर तर मी मातृभूमीच्‍या नात्‍याने भारतमातेवर प्रेम करत होतो; पण आता विदेशींची विलासिता पाहून, तसेच तत्त्वज्ञानरहित जीवन जगणार्‍या, त्‍यानुसार शरिराला ‘मी’ मानणार्‍या, संसारालाच खरे मानणार्‍या आणि ५ ते २५ लोकांच्‍या वाहवाहीतच (कौतुकातच) जीवन संपवणार्‍या लोकांना पाहून मला वाटते की, भारतमातेवर केवळ प्रेमच पुरेसे नाही, आता तर मी तिला नमस्‍कार करीन; कारण भारतातील सनातन धर्माच्‍या जीवनपद्धतीत मुक्‍ती आहे. नम्रता, सहजता आणि सज्‍जनता आहे. परोपकारिता ठासून भरलेली आहे आणि तेथील लोक सर्व काही करूनही ‘ईश्‍वरच करतो’, अशा विचाराचे धनी आहेत. आता तर भारतातील धूळही माझ्‍यासाठी पवित्र बनली आहे. आता माझ्‍यासाठी ती एक पुण्‍यभूमी आणि एक तीर्थस्‍थान आहे. मी भारतभूमीची पूजा करीन.’’ त्‍या इंग्रजाचे तोंड फिके पडले. तो लज्‍जित होऊन चूप बसला.

या भूमीसाठी ज्‍यांनी बलीदान दिले, ते देशाचे भक्‍त तर होतेच; पण भगवंताचेही भक्‍त होते. त्‍यांनी कोट्यवधी हिंदूंना शोषित होण्‍यापासून वाचवले आणि हसत हसत आपल्‍या देशासाठी बलीदान दिले.

(साभार : मासिक ‘ॠषी प्रसाद’, जुलै २०१७)