‘काही वेळा भाव असलेल्या साधकांकडे पाहून काही साधकांना वाटते, ‘आपल्यामध्ये एवढा भाव नाही, मग आपली प्रगती होत आहे का ?’ काही साधक विचारतात, ‘माझी पूर्वी भावजागृती व्हायची आणि आता होत नाही; म्हणजे माझी साधनेत घसरण तर होत नाही ना ?’
भावाश्रू येणे, कंठ दाटून येणे, यांसारखी भावजागृतीची लक्षणे व्यक्त भाव दर्शवणारी आहेत. सर्वसाधारणपणे साधक जसजसा गुरूंनी दिलेल्या सेवेशी अधिकाधिक एकरूप होऊ लागतो, तसतसे त्याच्यातील व्यक्त भावाचे रूपांतर अव्यक्त भावात होऊ लागते. ‘सेवेची तळमळ’, हे अव्यक्त भावाचे प्रधान लक्षण आहे. साधकाची प्रकृती, साधनामार्ग, सेवेचे स्वरूप आणि त्याची साधनेची स्थिती यांनुसारही त्याच्यात व्यक्त आणि अव्यक्त भावांचे प्रमाण अल्प-अधिक असते. भाव ही जिवाची तात्कालिक अवस्था आहे, तर ‘मनाची स्थिरता आणि आनंदावस्था’ हे जिवाने साध्य करावयाचे ध्येय आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनीही एका मार्गदर्शनात सांगितले आहे, ‘साधकांनी ‘आपल्यात भाव कोणता आहे ?’, याकडे लक्ष देण्यापेक्षा ‘आपले मन स्थिर आहे ना ?’, याकडे लक्ष देणे अधिक आवश्यक आहे.’
– पू. संदीप आळशी (३.६.२०२३)