दहावी आणि बारावी इयत्तेचा निकाल न्‍यून झालेल्‍या शाळांना नोटिसा !

आयुष प्रसाद

पुणे – जिल्‍ह्यातील माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक शाळांमधील दहावी आणि बारावी इयत्तेच्‍या निकालाची टक्‍केवारी सुधारण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने वार्षिक परीक्षेसाठी ७५ दिवसांचा निकालवृद्धी कार्यक्रम राबवला होता; मात्र तरीही २३ शाळांचा निकाल ८० टक्‍क्‍यांपेक्षा न्‍यून लागला. अशा शाळांना जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी नोटीस पाठवण्‍याचा आदेश माध्‍यमिक शिक्षण विभागाला दिला आहे. शाळेचे अनुदान बंद करण्‍याविषयी विचारणाही त्‍यांनी नोटिसीमध्‍ये केली. निकालवृद्धी कार्यक्रमाचा ५२ शाळांना लाभ झाला. या शाळांचा निकाल ८० टक्‍क्‍यांपेक्षा न्‍यून लागत असे; मात्र आता त्‍यांचा निकाल सुधारला आहे. जिल्‍ह्यातील ७५ शाळांची गुणवत्ता सुधारण्‍यासाठी निकालवृद्धी कार्यक्रम राबवण्‍यात आला.