‘१४.६.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. या धर्मध्वजाचे वैशिष्ट्य म्हणजे ध्वजाच्या एका बाजूला सिंहासनावर आरूढ असलेली प्रभु श्रीरामाची आकृती आहे आणि ध्वजाच्या दुसर्या बाजूला प्रभु श्रीराम रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आकृती आहे. ही धर्मध्वजावरील वैशिष्ट्यपूर्ण रचना तमिळनाडू येथील नाडीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींच्या आज्ञेनुसार केलेली आहे. धर्मध्वजाच्या पूजनाचे देवाने माझ्याकडून सूक्ष्म परीक्षण करवून घेतले. ते पुढे दिले आहे.
दु. ४.३० : धर्मध्वजाचे पूजन चालू होण्यापूर्वी ध्वजाच्या स्तंभावर सूक्ष्मातून पिवळ्या रंगाच्या दैवी लहरी एखाद्या वस्तूला दोरा गुंडाळलेला दिसतो, त्याप्रमाणे गुंडाळलेल्या दिसत होत्या आणि धर्मध्वजातून वातावरणात तुटक तुटक लाल रंगाच्या दैवी लहरी प्रक्षेपित होतांना दिसल्या.
दु. ४.४५ : ‘धर्मध्वजाचे पूजन चालू होताच आकाशातून पिवळ्या रंगाच्या दैवी लहरी ध्वजाच्या स्तंभाच्या टोकातून आत प्रवेश करत आहेत’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले आणि त्याच वेळी मला आकाशात सूक्ष्मातून ४ देवता उपस्थित असल्याचे दृश्य दिसले.
४.४६ : ‘पिवळ्या आणि लाल रंगांच्या दैवी लहरी एकत्रितपणे ध्वजाच्या स्तंभाच्या टोकातून आत प्रवेश करत आहेत’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले.
४.४७ : मला ध्वजस्तंभाच्या भोवती निळ्या रंगाची दैवी ऊर्जा सूक्ष्मातून दिसली.
४.५० : पाताळातील काही आसुरी शक्ती त्यांच्या तोंडातून विशिष्ट आवाज करत होत्या. त्यातून त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काळी (त्रासदायक) शक्ती प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करत होत्या.
४.५० : ‘धर्मध्वजावरील प्रभु श्रीराम रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आकृतीतून पांढर्या रंगातील ‘ॐ’ बाहेर आला आहे’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले. त्या वेळी माझा काही सेकंद आपोआप ‘ॐ’चा नामजप चालू झाला.
४.५३ : अनिष्ट शक्ती जोरजोरात ढोल वाजवून वातावरणात त्रासदायक नाद निर्माण करून धर्मध्वजाच्या पूजनाला विरोध करत होत्या.
४.५६ : ‘कार्यक्रमाच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले पांढर्या सदर्यात उभे आहेत’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले. यात विशेष म्हणजे त्याच्या पुढच्या क्षणी सूत्रसंचालन करणारी साधिका तेथे उपस्थित असलेल्या साधकांना म्हणाली, ‘‘येथे सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर उपस्थित आहेत.’’
४.५९ : सनातन संस्थेच्या पुरोहित पाठशाळेतील पुरोहित-साधक वेदमंत्र म्हणत होते. तेव्हा मला आकाशात सूक्ष्मातून शंखनादाचा ध्वनी काही क्षण ऐकू आला.
५.०२ : ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आकाशात सूक्ष्मातून पुष्कळ उंच रूप दिसले आणि ते हा कार्यक्रम पहात होते’, हे दृश्य पाहून माझा भाव जागृत झाला.
५.०५ : सद़्गुरु बिंदाताई धर्मध्वजाला चंदन अर्पण करणार होत्या, त्यापूर्वी चंदनातून पांढर्या आणि फिकट तपकिरी रंगांची एकत्रित दैवी ऊर्जा धर्मध्वजाच्या स्तंभाच्या दिशेने गेली. याचा अर्थ धर्मध्वजाला चंदन अर्पण करण्यापूर्वीच त्यातील शक्ती त्या स्तंभाला मिळाली होती.
५.०६ : सद़्गुरु बिंदाताईंनी धर्मध्वजाला अक्षता अर्पण केल्या. त्या वेळी आकाशात विजा चमकतात, त्याप्रमाणे ध्वजस्तंभाच्या भोवती दैवी लहरी चकाकतांना दिसल्या. त्या वेळी ध्वजस्तंभ ‘दैवी शक्तीने भारित झाला आहे’, असे मला जाणवले.
५.०६ : सद़्गुरु बिंदाताईंनी धर्मध्वजाला पुष्प आणि तुळशीपत्र अर्पण केले. त्या वेळी मला धर्मध्वजापासून काही अंतरावर सूक्ष्मातून एक देवी दिसली. तिचा एक हात आशीर्वादाच्या मुद्रेत होता. ती साक्षात् तुळशीमाता होती. तुळस ही श्रीकृष्णाची एक ‘लघुशक्ती’ आहे आणि ती देवीस्वरूप आहे.
५.०७ : सद़्गुरु बिंदाताईंनी धर्मध्वजाला धूप दाखवला. त्या वेळी कार्यक्रमापासून दूर अंतरावर उभे असलेल्या एका भुताने भीतीने एका हाताची बोटे स्वतःच्या तोंडात घातली. धुपामुळे भुतांना अधिक प्रमाणात त्रास होतो. त्याचा हा परिणाम होता.
५.१० : सद़्गुरु बिंदाताईंनी धर्मध्वजाला दीपाने ओवाळले. त्या वेळी प्रारंभी वातावरणात सोनेरी रंगाच्या दैवी कणांची निर्मिती झाली. त्यानंतर पांढर्या-निळ्या रंगांच्या दैवी कणांची निर्मिती झाली.
५.१२ : सद़्गुरु बिंदाताईंनी धर्मध्वजाला नैवेद्य दाखवला. त्या वेळी आकाशात धर्माशी संबंधित ४ देवता सूक्ष्मातून उपस्थित होत्या. ‘त्यांनी तो नैवेद्य ग्रहण केला आहे’, असे मला जाणवले.
५.१५ : सद़्गुरु बिंदाताईंनी धर्मध्वजाला ‘हीना’ अत्तर अर्पण केले. त्या वेळी अत्तरातून पिस्ता रंगाची दैवी ऊर्जा निर्माण झाली आणि ती ऊर्जा धर्मस्तंभात खालून वरच्या दिशेने ५ फूट अंतरापर्यंत पोचली.
५.१६ : कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व साधक, संत आणि सद़्गुरु यांनी धर्मध्वजाला नमस्कार केला. त्या वेळी मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांचा स्मितहास्य करतांनाचा चेहरा दिसला. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरु डॉक्टर हे धर्मस्वरूप आहेत. त्यामुळे सर्वांनी धर्मध्वजाला नमस्कार केला, म्हणजे तो नमस्कार परात्पर गुरु डॉक्टरांना केल्यासारखाच आहे. त्यामुळे मला त्यांचा स्मितहास्य करतांनाचा चेहरा दिसला.’
५.१७ : गंधर्वलोकातील राखाडी रंगाचा वेश परिधान केलेली एक अप्सरा खाली कार्यक्रमाच्या ठिकाणी आली आणि ती मला सूक्ष्मातून १ – २ सेकंद नृत्य करतांना दिसली.
५.१८ : पाताळातून काही अनिष्ट शक्ती कार्यक्रमात अडथळा आणण्यासाठी वटवाघूळांच्या रूपात वर येतांना दिसल्या.
५.२३ : सद़्गुरु बिंदाताई धर्मध्वज स्तंभावर चढवत असतांना आकाशातून एक तेजाचा गोळा स्तंभाच्या वरच्या टोकावर आलेला दिसला. ध्वज हळूहळू स्तंभाच्या टोकापर्यंत पोचला. तेव्हा त्या तेजाने स्तंभाच्या टोकाजवळ गोल आकार धारण केला. त्यानंतर तेजाचा काही भाग धर्मध्वजात सामावल्याने ध्वज तेजोमय दिसू लागला.
धर्मध्वजातील लाल रंगाची दैवी शक्ती आणि स्तंभाच्या वरच्या टोकावरील पांढर्या रंगातील तेजशक्ती एकत्रित होऊन ती वातावरणात पसरू लागली. धर्मध्वज हा धर्माची प्रेरणा आहे आणि त्याला बळ हे तेजामुळे प्राप्त होते. त्यातून ‘धर्मबळ’ सिद्ध होते. धर्मप्रेमींमध्ये धर्मबळ निर्माण करण्याचे कार्य ‘धर्मध्वज’ करत असतो.
५.२५ : ‘तलावात पाण्याच्या लहरींचा वर-खाली आकार दिसतो, त्याप्रमाणे धर्मध्वजातून पांढर्या आणि लाल रंगांच्या एकत्रित धर्मलहरी वातावरणात सौम्यपणे; परंतु प्रभावीरितीने दूर अंतरापर्यंत प्रक्षेपित होत आहेत’, असे दृश्य मला दिसले.
५.२७ : कार्यक्रमाच्या शेवटी पुरोहित-साधकांनी रामरक्षा स्तोत्रातील श्रीरामाचा एक श्लोक म्हटला. त्या वेळी धर्मध्वजापासून वर उंचावर सूक्ष्मातून एक सुवर्णाच्या रंगाचा रथ दिसला; परंतु ‘त्यात कोण बसले आहे ?’ ते मला समजले नाही.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.६.२०२३)
|