पुरीतील भगवान जगन्नाथाच्या जगप्रसिद्ध यात्रेला २० जूनपासून प्रारंभ !

२५ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता !

पुरी (ओडिसा) – उद्या, २० जूनपासून पुरीमध्ये जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेमध्ये २५ लाख लोक सहभागी होण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. संपूर्ण शहर १४ विभाग आणि २९ क्षेत्र यांमध्ये विभागले जाणार आहे.

यात्रेला वैदिक मंत्रोच्चाराने प्रारंभ होणार आहे. या वेळी जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे अलौकिक दर्शन होणार आहे. २१ जून या दिवशी भगवान जगन्नाथ रथावर स्वार होऊन गुंडीचा मंदिराकडे प्रस्थान करतील. जगन्नाथ मंदिरातील देवतांच्या ‘नबजौबन’ दर्शनाला ३ घंटे अनुमती असणार आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा ‘अनसार’ घरामध्ये (आजारी खोलीमध्ये) १४ दिवस घालवल्यानंतर ‘नबजौबन बेशा’ (तरुण पोशाखामध्ये) मध्ये दिसणार आहेत.

भाविकांनचे उन्हापासून रक्षण करण्याची सिद्धता !

उन्हाचा प्रकोप पहाता प्रशासनाने अनुमाने २५ लाख पाण्याच्या बाटल्यांचा साठा केला आहे. त्यांच्या वाटपाचे दायित्व स्वयंसेवकांवर देण्यात आले आहे. गर्दीत तापमान वाढू नये; म्हणून पाणी शिंपडण्यासाठी यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासह  ७२ रुग्णवाहिकाही यात्रा मार्गावर तैनात करण्यात येणार आहेत. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी विशेष मार्ग निर्माण करण्यात आला आहे.