गोवा : क्रांतीलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

पणजी, १८ जून (वार्ता.) – ‘आतापर्यंत इयत्ता चौथीच्या ‘गोमंत बाल भारती’ पाठ्यपुस्तकात गोव्याचा स्वातंत्र्यलढा थोडक्यात शिकवण्यात येत होता. आता पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ११ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात क्रांतीदिनाचा इतिहास आणि गोव्याचा स्वातंत्र्यलढा शिकवण्यात येणार आहे, असे आश्वासन मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

पणजी येथील आझाद मैदानात १८ जून या दिवशी आयोजित केलेल्या क्रांतीदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष गुरुदास कुंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले,

‘‘स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी झालेल्या अनेक बंडांचा आम्ही पाठ्यपुस्तकात समावेश करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलीदान आणि त्यांचा त्याग युवा पिढीपर्यंत पोचवण्यासाठी क्रांतीलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळ हा तंत्रज्ञानाचा आहे. कोडिंग, रोबोटिक, स्टार्टअप संकल्पना, कौशल्यपूर्ण भारत यांसारख्या क्षेत्रांत क्रांती करण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकर्‍या देण्याचे आम्ही घोषित केले होते आणि गेल्या १० वर्षांत बहुतेकांना सरकारी नोकर्‍या देण्यात आल्या. पुढच्या क्रांतीदिनाच्या पूर्वी उर्वरित सर्वांना नोकर्‍या दिल्या जातील.’’

स्वातंत्र्यसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही

राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांवर सरकार अन्याय होऊ देणार नाही. निवृत्तीवेतनाविना राहिलेल्यांची निवृत्तीवेतन प्रक्रिया आमचे अधिकारी त्यांच्या घरी जाऊन पूर्ण करणार आहेत. पुढील २-३ मासांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • गोवा मुक्तीच्या ६० वर्षांत क्रांतीलढ्याचा इतिहास, कुंकळ्ळीवासियांचा लढा, इन्क्विझिशनचा भयानक इतिहास पाठ्यपुस्तकात अंतर्भूत न होणे दुर्दैवी !
  • स्वातंत्र्यसेनानी टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्‍हास’ झाल्याचे म्हटले, ते योग्यच होते !