गेल्या काही वर्षांचे चित्र बघता वारीमध्ये तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याविषयी माध्यमांनी तरुणांशी संवाद साधला असता ‘दैनंदिन जीवनात असलेला ताणतणाव दूर करण्यासाठी विठ्ठलाचे नामस्मरण हेच जीवनाचे सार आहे’, असे अनेकांनी सांगितले. या वर्षी वारीतील तरुणांची ही संख्या सध्या ३० ते ३५ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे ‘वारीला केवळ वृद्ध जातात’, असा अपसमज आता दूर होत आहे. तरुण आता वैष्णवांची ही पताका सामर्थ्याने खांद्यावर घेऊन विठ्ठलाची आस धरत आहेत. यामध्ये शहरातील तरुणांची संख्या वाढत आहे, हे विशेष ! पुण्यातील आधुनिक वैद्य, माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात विविध पदांवर कार्य करणार्या उत्साही तरुणांचा यात सहभाग असतो. सध्याच्या समाजमाध्यमांच्या काळात क्षणिक सुखाऐवजी कायमस्वरूपी तणावमुक्त जीवनाचा ध्यास घेऊनच ही तरुण मंडळी वारीत सहभागी होत आहेत. यामध्ये भक्तीचा गाभा नक्की किती आहे, हे समजणे कठीण आहे; परंतु वारी ही अशी उपजतच इतकी भक्तीमय आहे की, एखाद्याने पर्यटनासाठी म्हणून वारीत सहभागी व्हायचे कितीही ठरवले, तरी आपोआपच तो विठ्ठलनामात दंग होऊन जाईल, यात शंका नाही. अनेक विदेशीही वारीचे सांस्कृतिक वैभव ऐकून या वारीत सहभागी होण्यासाठी येतात. त्यांनी वारीविषयी विस्तृत लिखाणही केले आहे.
कोरोना महामारीच्या कालखंडापूर्वीच्या काही वर्षांचा अभ्यास केला असता वारीतून मार्गक्रमण करणार्या तरुण वारकर्यांची संख्या हळूहळू वाढल्याचे लक्षात येते. इतर वेळी एखादा किलोमीटरही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण वारीची वाटही सहज चालतात. त्यांना अचंबित करणार्या कित्येक अनुभूती येतात. विठ्ठलाच्या ओढीने ज्येष्ठ, वयस्कर वारकरीही घाटातील आणि खडतर प्रवास आणि ऊन-पावसाची तमा न बाळगता वारी करत असतात. पालखीच्या समवेत चालतांना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो, म्हणजेच इथे विज्ञानाच्याही पुढे असणार्या अध्यात्माचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. या दैवी ऊर्जेच्या ओढीनेच सर्व वयोगटांतील वारकरी आणि आता उच्चशिक्षित तरुणही वारीकडे ओढले जाऊ लागले आहेत. वारी वर्षातून एकदाच असते. त्यामुळे सततच ही आध्यात्मिक ऊर्जा मिळण्यासाठी, म्हणजे अध्यात्माचा हा प्रवास अखंड चालू ठेवण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी तरुणांनी प्रतिदिन योग्य साधना करणे आवश्यक आहे. यातून जीवनातील ताण सुसह्य होऊन त्यांना आत्मबळ मिळेल आणि त्यांचे व्यावहारिक जीवनही सुखी होईल, यात शंका नाही.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे