इगतपुरी येथे गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या ३ जणांना मारहाण

एकाचा मृत्‍यू ….६ हिंदु तरुणांना अटक !

इगतपुरी (जिल्‍हा नाशिक) – गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या ३ संशयित आरोपींना काही स्‍थानिक हिंदु तरुणांनी ८ जून या दिवशी कसारा परिसरात बेदम मारहाण केली होती. यानंतर लुकमान सुलेमान अन्‍सारी हा बेपत्ता झाला होता. आता इगतपुरीजवळील घाटणदेवी परिसरातील दरीत अन्‍सारी हा मृत अवस्‍थेत सापडला. या प्रकरणी पोलिसांनी ६ हिंदु तरुणांवर खुनाचा गुन्‍हा नोंद केला असून त्‍यांना न्‍यायालयाने १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कारेगावकडून आलेल्‍या १५ ते २० जणांनी हा टेम्‍पो अडवून त्‍यांना मारहाण केली. टेम्‍पोतील ३ व्‍यक्‍तींपैकी अकील गुलाम गवंडी पळून गेला. तरुणांनी उरलेल्‍या दोघांना घाटणदेवी मंदिरासमोर आणून पुन्‍हा मारहाण केली. या वेळी लुकमान अन्‍सारी हा दरीच्‍या दिशेने पसार झाला. यानंतर तरुणांनी घायाळ झालेला अतीश हर्षद पद्दी याला इगतपुरी पोलिसांच्‍या कह्यात दिले. पोलिसांनी त्‍याला उपचारासाठी ग्रामीण रुग्‍णालयात भरती केले आहे.

९ जून या दिवशी अन्‍सारी बेपत्ता झाल्‍याची तक्रार इगतपुरी पोलीस ठाण्‍यात प्रविष्‍ट झाली. १० जून या दिवशी दरीत त्‍याचा मृतदेह आढळून आला. त्‍यानंतर पोलिसांनी पप्‍पू उपाख्‍य प्रदीप आडोळे, भास्‍कर भगत, विजय भागडे, चेतन सोनवणे, रूपेश जोशी आणि शेखर गायकवाड या ६ संशयितांना अटक केली, तसेच गोवंशियांची अनधिकृतपणे वाहतूक केल्‍याप्रकरणी अतीश हर्षद पद्दी आणि अकील गवंडी यांच्‍यावरही गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका :

  • पोलीस गोवंशियांची वाहतूक रोखू शकत नसल्‍यामुळे गोप्रेमींना गोवंशियांची अवैध वहातूक रोखावी लागते ! हे पोलिसांचे अपयशच आहे ! पोलीस त्‍यांचे कर्तव्‍य कधी बजावणार ?
  • बेपत्ता झालेला अन्‍सारी हा या दरीत स्‍वतःहून पडलेलाही असू शकतो. हिंदूंवर तत्‍परतेने गुन्‍हे नोंद करणारे पोलीस हीच तत्‍परता गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍यांच्‍या संदर्भात कधी दाखवणार ?