‘सरकारी काम आणि ६ मास थांब’ ही संकल्पना मोडीत काढायची आहे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुडाळ येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या वेळी आश्वासन

कुडाळ (सिंधुदुर्ग) – सरकार आणि जनता यांच्यातील दरी न्यून करण्याचा प्रयत्न चालू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की, जनतेला त्रास न होता तिची कामे झाली पाहिजेत. हा आदर्श घेऊन आम्ही काम करत आहोत. कागदी घोडे नाचवणारे आमचे सरकार नाही. ‘सरकारी काम आणि ६ मास थांब’ ही संकल्पना आपल्याला मोडीत काढायची आहे. जनतेला शासकीय कार्यालयांत मारावे लागणारे हेलपाटे आम्हाला थांबवायचे आहेत, त्यासाठीच राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेला एकाच ठिकाणी विविध सुविधा देण्यात येत आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या वेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय उपक्रमाचा प्रारंभ ६ जून या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कुडाळ येथे झाला. तत्पूर्वी सिंधुदुर्गात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाजप आणि शिवसेना यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

प्रारंभी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी या मतदारसंघातील विविध विकासकामांचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सावंतवाडीकरांच्या वतीने सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले आणि माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे अन् केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कुडाळ येथे सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती देऊन, तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘गोमय गणेशमूर्ती’(गायीचे शेण आणि माती यांपासून बनवलेली मूर्ती) देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.कुडाळ येथील कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणातील निसर्गसंपदा, हिरवळ पर्यटकांना भुरळ पाडणारी आहे. त्यामुळे जगाला हेवा वाटेल, असे कोकण निर्माण करूया. यासाठी आवश्यक निधी देऊन सर्व सुविधा कोकणात निर्माण केल्या जातील. महाराष्ट्राला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह युवा पिढीला रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. मूलभूत सुविधांसह आरोग्य सुविधाही जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागापर्यंत सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र वेगाने प्रगत होत आहे. यासाठी केंद्राकडूनही साहाय्य मिळत आहे. केंद्रशासनाकडे पाठवण्यात येणार्‍या प्रस्तावांना तातडीने संमती देऊन निधी देण्यात येत आहे.

‘आतापर्यंत महाराष्ट्रात झालेल्या या कार्यक्रमांमध्ये कुडाळ येथील कार्यक्रम ‘रेकॉर्ड’ मोडणारा आहे. विनासायास कार्यक्रमाचा लाभ घेता यावा, यासाठी उत्कृष्ट नियोजन प्रशासनाने केले’, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे कौतुक केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्य करमुक्त करण्याची मंत्री केसरकर यांची मागणी  

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने गोवा राज्याप्रमाणे सिंधुदुर्गातही मद्य करमुक्त करावे. गोवा राज्य अन् सिंधुदुर्ग जिल्हा या दोन्हीकडचे मद्याचे दर समान करावे, जेणेकरून मद्याची अवैध वाहतूक आणि विक्री यांना आळा बसेल, अशी मागणी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे मुख्यमंत्र्यांकडे केली. (मद्याच्या अवैध वाहतुकीला आळा बसवण्यासाठी मद्य करमुक्त करणे नव्हे, तर अवैध कृत्ये करणार्‍यांवर जरब बसवणे आवश्यक आहे आणि हेच जनतेला अपेक्षित आहे ! – संपादक)

या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूण करण्याची मागणी !

सावंतवाडी – ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसला सावंतवाडी स्थानकावर थांबा द्या, तसेच  सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ण करा, मुंबई-गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्या आदी मागण्यांचे निवेदन सावंतवाडी पत्रकार संघाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.