सिंधुदुर्ग : नेमळे ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखली !

  • सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

  • प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास स्थगित

(प्रतिकात्मक चित्र)

सावंतवाडी – मुंबई-गोवा महामार्गावरील नेमळे, मळगाव आणि वेत्ये या गावांच्या परिसरात वारंवार अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ ५ जून या दिवशी नेमळे सर्कल येथे ग्रामस्थांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन करून या मार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. ‘ग्रामस्थांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल’, असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे; मात्र या मागणीविषयी योग्य तो निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत ग्रामस्थांना बाजूला करून महार्गावरील वाहतूक पूर्ववत् केली.

(सौजन्य : Kokanshahi) 

मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी या भागातील नेमळे, मळगाव आणि वेत्ये या परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. याविषयी २९ मे या दिवशी नेमळे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना बोलावून त्यांच्याशी अपघातांविषयी चर्चा करण्यात आली होती, तसेच काही सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ७ दिवसांत अपघात रोखण्यासाठी उपाययोजना न राबवल्यास ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्याची चेतावणी देण्यात आली होती. असे असतांनाही अद्यापपर्यंत अधिकार्‍यांनी कोणतीही उपाययोजना राबवली नाही किंवा ग्रामस्थांनी दिलेल्या चेतावणीची नोंदही घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन केले होते.

संपादकीय भूमिका

  • अपघात टाळण्यासाठी प्रशासन काही करत नाही; म्हणून जनतेला आंदोलन करावे लागणे, प्रशासनाला लज्जास्पद !
  • जनतेने आंदोलन केल्यावर प्रशासनाकडून केवळ आश्वासन नको, तर तातडीने ठोस कृती अपेक्षित आहे !