सातारा शहराचा ऐतिहासिक वारसा जपावा ! – शंभूराज देसाई

दीपप्रज्वलन करताना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

सातारा – सातारा नगरीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा ऐतिहासिक वारसा जपण्याचे कार्य सर्वांनी करावे, असे आवाहन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. गांधी मैदान येथे श्री शिवराज्याभिषेकदिन उत्सव समिती आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यामाने ३५० व्या श्री शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री शिवराज्याभिषेकदिन उत्सव समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गोरे, स्वागताध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष हरिष पाटणे, उपाध्यक्ष अमोल मोहिते, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मंत्री देसाई पुढे म्हणाले की, समितीच्या माध्यमातून चांगले उपक्रम राबवले जात आहेत. राज्य सरकारच्या वतीनेही दुर्गराज रायगड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दिमाखदार श्री शिवराज्याभिषेकदिन सोहळा संपन्न झाला. राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला उजाळा देण्याचे कार्य करत आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू आणि या राजवाड्याचेही जतन अन् संवर्धन व्हावे, यासाठी राज्य सरकारकडून निधी दिला जाईल.