छत्रपती संभाजीनगर येथे फिरते गर्भलिंग निदान केंद्र चालवणारे आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना अटक !

 दूरभाष करताच आधुनिक वैद्य परिचारिकेसह घरी पोचायचे !

  गर्भलिंग निदान चाचणी करणारे साहित्य व चारचाकी वाहन ( संग्रहीत छायाचित्र )

छत्रपती संभाजीनगर – वाळूज परिसरात फिरते गर्भलिंग निदान केंद्र चालवण्याच्या रॅकेटचा पोलिसांनी २ मे या दिवशी भांडाफोड केला आहे. यातील आरोपी आधुनिक वैद्य सुनील राजपूत हा परिचारिका पूजा भालेराव हिला आणि गर्भलिंग निदान चाचणी करणारे साहित्य घेऊन चारचाकी वाहनातून फिरत होता. दूरभाष केल्यावर तो थेट घरी गर्भलिंग निदान करण्यासाठी येत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून आधुनिक वैद्य सुनील राजपूत आणि परिचारिका पूजा भालेराव यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.

गर्भलिंग निदान करण्यास कायद्यानुसार बंदी असतांनाही वाळूज भागात आधुनिक वैद्य राजपूत हा फिरते गर्भलिंग निदान रॅकेट चालवत असल्याची माहिती खबर्‍याने पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना दिली होती. ही माहिती मिळताच संबंधित आधुनिक वैद्य राजपूत याला कह्यात घेण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर एका महिलेस आधुनिक वैद्य राजपूत याच्याशी संपर्क करायला लावून गर्भलिंग निदान चाचणी करायची आहे, असे सांगितले. त्याने त्या महिलेस गर्भलिंग निदान चाचणी करण्यास होकार देत २ जून या दिवशी वाळूज येथे चाचणी करण्यास येतो, असे सांगितले. राजपूत याने गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी होकार देताच पोलिसांनी गंगापूर येथील वैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधून पंचासमक्ष वाळूज भागात सापळा रचला. आरोपी राजपूत आणि पूजा भालेराव हे दोघे त्या महिलेच्या घरी जाऊन पोर्टेबल यंत्राच्या साहाय्याने गर्भलिंग निदान चाचणी करत असतांना पोलिसांनी धाड टाकून दोघांना कह्यात घेतले.