जळूच्‍या समोर अ‍ॅलोपॅथी, होमियोपॅथी आणि आयुर्वेदीय औषधांच्‍या गोळ्‍या ठेवल्‍यावर तिने दिलेला प्रतिसाद आणि तिच्‍यावर झालेला परिणाम

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया‘ने ‘यू.ए.एस्. (युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘आयुर्वेदाची देवता श्री धन्‍वंतरि देवाच्‍या चित्रात तिच्‍या उजव्‍या हातात जळू पहायला मिळते. जळवांचा उपयोग आयुर्वेदामध्‍ये साधारणपणे शरिरातील रक्‍ताच्‍या संदर्भातील व्‍याधी निवारणासाठी केला जातो. जळूच्‍या समोर अ‍ॅलोपॅथी, होमियोपॅथी आणि आयुर्वेदीय औषधांच्‍या गोळ्‍या ठेवल्‍यावर तिने दिलेला प्रतिसाद आणि तिच्‍यावर होणारा परिणाम अभ्‍यासण्‍यासाठी ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्‍यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्‍कर्ष आणि अध्‍यात्‍मशास्‍त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

सर्दी बरी होण्‍यासाठी दिल्‍या जाणार्‍या अ‍ॅलोपॅथी, होमियोपॅथी आणि आयुर्वेदीय औषधांच्‍या गोळ्‍या ऐकमेकांपासून काही अंतरावर जळू समोर मांडून ठेवण्‍यात आल्‍या.

१ अ. अ‍ॅलोपॅथी गोळीमध्‍ये नकारात्‍मक ऊर्जा आणि होमियोपॅथी अन् आयुर्वेदीय गोळ्‍यांमध्‍ये सकारात्‍मक ऊर्जा आढळून येणे : अ‍ॅलोपॅथी गोळीमध्‍ये नकारात्‍मक ऊर्जा, तर होमियोपॅथी अन् आयुर्वेदीय गोळ्‍यांमध्‍ये सकारात्‍मक ऊर्जा आढळून आली. हे पुढे दिलेल्‍या सारणीतून लक्षात येते.

१ आ. जळूने औषधांच्‍या गोळ्‍यांना दिलेला प्रतिसाद आणि तिच्‍यावर झालेला परिणाम : ती प्रथम आयुर्वेदीय औषधाच्‍या गोळीजवळ गेली आणि तिला स्‍पर्श केला. त्‍यानंतर ती आयुर्वेदीय आणि होमियोपॅथी गोळ्‍यांच्‍या मधून गेली. त्‍यानंतर ती अ‍ॅलोपॅथी औषधाच्‍या गोळीजवळ गेली आणि तिला स्‍पर्श केला. एकूण २० मिनिटांच्‍या प्रयोगात जळू अधिकांश वेळ आयुर्वेदीय गोळीपाशी थांबत असल्‍याचे निदर्शनास आले. प्रयोगापूर्वी जळूमध्‍ये नकारात्‍मक ऊर्जा नसून सकारात्‍मक ऊर्जा होती आणि तिची प्रभावळ २.८० मीटर होती. प्रयोगानंतर तिच्‍यातील सकारात्‍मक ऊर्जेत थोडी वाढ होऊन ती ३.१० मीटर झाली.

आयुर्वेदीय गोळीकडे आकर्षित झालेली जळू

२. चाचणीचा निष्‍कर्ष

आयुर्वेदीय औषधाच्‍या गोळीतून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वप्रधान स्‍पंदनांमुळे जळू आयुर्वेदीय औषधाच्‍या गोळीजवळ अधिकांश वेळ थांबली. प्रयोगानंतर तिच्‍या सकारात्‍मक ऊर्जेत थोडी वाढ झाली.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्‍यात्‍मशास्‍त्रीय विश्‍लेषण

३ अ. चाचणीतील अ‍ॅलोपॅथी गोळीमध्‍ये नकारात्‍मक स्‍पंदने असणे : अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीमध्‍ये रोगाचे मूळ कारण शोधून त्‍यावर उपचार न करता केवळ रुग्‍णाला झालेला आजार दूर करण्‍यासाठी त्‍याला औषधे दिली जातात. अनेक संशोधनांवरून हे सिद्ध झाले आहे की, अ‍ॅलोपॅथी औषधांमध्‍ये असणार्‍या रासायनिक घटकांमुळे ती आरोग्‍यासाठी घातक असू शकतात. काही वेळा त्‍यांतील रासायनिक घटकांमुळे देहातील विषाणू लगेच मरतात; परंतु त्‍यांचे देहावर दूरगामी नकारात्‍मक परिणामही होऊ शकतात, तसेच त्‍यांतून तमोगुणी स्‍पंदनांचे प्रक्षेपण होते. चाचणीतील अ‍ॅलोपॅथी गोळीमध्‍ये तमोगुणी (त्रासदायक) स्‍पंदने असल्‍याने त्‍यामध्‍ये नकारात्‍मक स्‍पंदने आढळली.

३ आ. चाचणीतील होमियोपॅथी गोळीमध्‍ये अल्‍प प्रमाणात, तर आयुर्वेदीय गोळीमध्‍ये अधिक प्रमाणात सकारात्‍मक स्‍पंदने असणे : ‘होमियोपॅथी उपचार पद्धतीमध्‍ये रुग्‍णाचा आजार बरा करण्‍यासाठी त्‍याची संपूर्ण माहिती घेण्‍यात येते आणि त्‍यानुरूप त्‍याला औषधे देण्‍यात येतात. ही औषधे पशू, वनस्‍पती, खनिज आणि सिंथेटीक पदार्थांपासून बनवलेली असतात.’ (संदर्भ : संकेतस्‍थळ)

आयुर्वेदीय उपचार पद्धतीमध्‍ये रुग्‍णाला झालेल्‍या रोगाचे मूळ कारण शोधून त्‍यावर रुग्‍णाच्‍या प्रकृतीनुसार (वात, पित्त, कफ) उपचार करण्‍यात येतात. रुग्‍णाला आयुर्वेदीय औषधे देण्‍यासह योग्‍य आहार-विहार, तसेच पथ्‍य-अपथ्‍य इत्‍यादी संदर्भातही मार्गदर्शन करण्‍यात येते. आयुर्वेदीय औषधांचे देहावर कोणतेही नकारात्‍मक परिणाम होत नाहीत, तसेच आजार मूळापासून नष्‍ट होतात. आयुर्वेदीय औषधांतून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वप्रधान स्‍पंदनांमुळे आणि आयुर्वेदीय औषधांमध्‍ये असणार्‍या नैसर्गिक घटकांमुळे ती आरोग्‍यासाठी हितावह असतात. चाचणीतील होमियोपॅथी गोळीमध्‍ये अल्‍प प्रमाणात, तर  आयुर्वेदीय गोळीमध्‍ये अधिक प्रमाणात सात्त्विक स्‍पंदने असल्‍याने त्‍यातून त्‍या त्‍या प्रमाणात सकारात्‍मक स्‍पंदने प्रक्षेपित झाली.

३ इ. जळूला तिन्‍ही प्रकारच्‍या औषधांच्‍या गोळ्‍यांमधून प्रक्षेपित होणारी नकारात्‍मक किंवा सकारात्‍मक स्‍पंदने ओळखता आल्‍याने तिने त्‍यानुरूप प्रतिसाद देणे : चाचणीतील होमियोपॅथी गोळीतून अल्‍प प्रमाणात, तर आयुर्वेदीय गोळीतून अधिक प्रमाणात सकारात्‍मक स्‍पंदने प्रक्षेपित होत आहेत, हे जळूला बरोबर ओळखता आले. त्‍यामुळे ती प्रथम आयुर्वेदीय औषधाच्‍या गोळीकडे गेली. त्‍यानंतर ती आयुर्वेदीय अन् होमियोपॅथी गोळ्‍यांच्‍या मधून गेली. जळूने अ‍ॅलोपॅथी गोळीला स्‍पर्श केला. तिला त्‍यातून नकारात्‍मक स्‍पंदने प्रक्षेपित होत असल्‍याचे लक्षात आल्‍याने ती त्‍या गोळीजवळ थांबली नाही. एकूण २० मिनिटांच्‍या प्रयोगात जळू अधिकांश वेळ आयुर्वेदीय गोळीपाशी थांबत होती. प्रयोगानंतर जळूच्‍या सकारात्‍मक ऊर्जेत थोडी वाढ झाली. सर्वच व्‍यक्‍ती, वास्‍तू किंवा वस्‍तू यांमध्‍ये सकारात्‍मक ऊर्जा असतेच, असे नाही. जळूमध्‍ये ३.१० मीटर, म्‍हणजे पुष्‍कळ सकारात्‍मक ऊर्जा असल्‍याचे आणि तिने तिन्‍ही गोळ्‍यांना दिलेला प्रतिसाद पाहून ती सात्त्विक असल्‍याचे लक्षात येते. या जळूमध्‍ये सूक्ष्मातील कळण्‍याची क्षमता असल्‍याने तिला तिन्‍ही प्रकारच्‍या औषधांच्‍या गोळ्‍यांमधून प्रक्षेपित होणारी नकारात्‍मक किंवा सकारात्‍मक स्‍पंदने ओळखता आली.’

– डॉ. अमित भोसले, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, मिरज. (१४.९.२०२०)

ई-मेल : [email protected]

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.