भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक व्हावे ! – रमेश बैस, राज्यपाल

‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कारा’ने मेजर कौस्तुभ राणे यांचा मरणोत्तर सन्मान !

मुंबई – ‘ने मजसी ने’ आणि ‘जयोस्तुते’ या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काव्यरचना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात, तसेच नाशिकमधील भगूर या त्यांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी त्यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी शासनाला केली. २१ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे राज्यपालांच्या हस्ते मेजर कौस्तुभ राणे यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ देऊन मरणोत्तर सन्मान करण्यात आला. या वेळी राज्यपालांनी वरील सूचना केली. मेजर कौस्तुभ राणे यांचा पुरस्कार त्यांची आई ज्योती राणे आणि वडील प्रकाश राणे यांनी स्वीकारला.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने पुरस्कार वितरण !

या वेळी कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. अभय करंदीकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार’, तर नागपूर येथील ‘मैत्री परिवार’ या संस्थेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसार कार्यासाठी अधिवक्ता बाबा (प्रदीप) परुळेकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह    पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि माजी पोलीस महासंचालक श्री. प्रवीण दीक्षित आणि कार्याध्यक्ष रणजित सावरकर उपस्थित होते.

कौस्तुभप्रमाणे अनेक तरुण सिद्ध होऊन सैन्यात जावेत ! – ज्योती राणे, कौस्तुभ राणे यांची आई

आपल्या देशामध्ये होऊन गेलेल्या श्रेष्ठ महापुरुषांच्या मालिकेतील स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तेजस्वी रत्न होय. त्यांच्या नावे शौर्य पुरस्कार मिळणे, ही भाग्याची गोष्ट आहे. कौस्तुभ याची पत्नी म्हणजे आमची सून कनिका सैन्यामध्ये भरती होऊन आमचे स्वप्न पूर्ण करत आहे. सध्या त्या कॅप्टन पदावर आहेत. कौस्तुभ याचा मुलगा म्हणजे आमचा नातू हाही सैन्याच्या वातावरणात आहे. कौस्तुभ याच्याप्रमाणे अनेक तरुण सिद्ध व्हावेत आणि ते सैन्यामध्ये जावेत.