१. ‘सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी मी तपोभूमी, कुंडई (गोवा) येथील ब्रह्मानंद स्वामींच्या मठात जात होते आणि शिवाची उपासना करत होते.
२. सनातनशी संपर्क आणि नामजपाला प्रारंभ
वर्ष १९९७ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेडशी (तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे सभा झाली होती. त्या सभेला मी गेले होते. तेव्हापासून मी कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करण्यास प्रारंभ केला.
३. सत्संगात जाणे आणि विविध सेवांना प्रारंभ करणे
वर्ष १९९५ मध्ये भेडशी येथील साधकांनी (डॉ. मोहन पाटील यांनी) मला सत्संगाला येण्यास सांगितले; पण मी तपोभूमी, कुंडई (गोवा) येथील ब्रह्मानंद स्वामींच्या मठात जात असल्याने सनातनच्या सत्संगाला गेले नाही. नंतर वर्ष १९९९ पासून मी सत्संगाला जाऊ लागले. त्यानंतर मी प्रासंगिक सेवेत सहभागी होणे, नामदिंडीत सहभागी होणे आणि सांगितलेल्या अन्य सेवा करणे, असे करत होते. वर्ष २००८ पासून दैनिक ‘सनातन प्रभात’चा गठ्ठा वितरकांकडे नेऊन देणे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ची वर्गणी जमा करणे, या सेवाही मी करू लागले. नंतर माझ्या मनात ‘घरात राहून सात्त्विक उत्पादनांची विक्री करावी’, असा विचार आला.
४. श्री गणेशचतुर्थीविषयी लिहिलेला फलक वाचून एका दांपत्याने कौतुक करणे
वर्ष २०१३ मध्ये मला भेडशीच्या बाजारपेठेत फलक लिखाणाच्या सेवेची (गावामधील चौकाचौकांत हिंदूंवरील आघातांची वृत्ते, तसेच धर्मशिक्षण देणारी माहिती फलकावर लिहिणे आणि जनजागृती करणे) संधी मिळाली. ही सेवा मी आजपर्यंत करत आहे. प्रारंभी माझे अक्षर चांगले नव्हते; पण नंतर अक्षर सुधारत गेले. कितीतरी जणांनी ‘फलक कोण लिहिते ?’, असे विचारले. तेव्हा ‘देवच माझ्याकडून फलक लिहून घेतो’, असे मी सांगत असे. एकदा श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीत गावात मुंबईहून एक दांपत्य आले होते. त्यांनी श्री गणेशचतुर्थीविषयी लिहिलेला फलक वाचला आणि ती महिला म्हणाली, ‘‘किती सुंदर माहिती लिहिली आहे !’, तेव्हा तिचे यजमान तिला म्हणाले, ‘‘असे सनातनचे साधक लिहितात.’’
५. रुग्णाईत असतांना साधकांनी साहाय्य करणे
वर्ष २०१९ मध्ये मी रुग्णाईत झाले. तेव्हा माझा दुसरा मुलगा श्री. प्रशांत नोकरीनिमित्त सावंतवाडीला गेला होता. त्याने तेथूनच साधकांना संपर्क केला आणि साधकांनी मला रुग्णालयात भरती केले. त्या वेळी मी बेशुद्धावस्थेत होते.’’ रुग्णालयात माझ्यावर प्राथमिक उपचार करून नंतर मला गोवा येथील इस्पितळात नेण्यात आले.
६. मी रुग्णाईत असतांना तेथील परिचारिका साधकांना म्हणाली, ‘‘यांचे ओठ का हलतात, ते समजत नाही.’’ तेव्हा साधकांनी सांगितले, ‘‘त्या नामजप करत आहेत.’’
७. रुग्णालयात असतांना सूक्ष्मातून गुरुदेवांचे अस्तित्व जाणवून ‘ते चैतन्य देत आहेत’, असे जाणवणे
रुग्णालयात असतांना प.पू. गुरुदेव सूक्ष्मातून माझ्याजवळ होते. ‘ते मला चैतन्य देत आहेत’, असे मला जाणवत होते. माझे ‘सिटी स्कॅन’ करायचे होते. तेव्हा मी डोळे उघडून ‘काय करतात ?’, ते पहात होते. तेव्हा त्या यंत्राच्या गोलामध्ये मला गुरुदेवांचे दर्शन झाले. नंतर ‘सिटी स्कॅन’ आणि ‘एम्.आर्.आय.’चा अहवाल सर्वसाधारण (रिपोर्ट नॉर्मल) आल्यावर मला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. (‘सिटी स्कॅन’ आणि ‘एम्.आर्.आय.’ ही रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याची तंत्रज्ञाने आहेत.)
८. साधकाशी भ्रमणभाषवर बोलल्यावर शरिरावरील जडपणा निघून जाऊन एकदम हलके वाटणे
रुग्णालयात असतांना मला एका साधकाचा सेवेविषयी भ्रमणभाष आला. तेव्हा माझ्यावर असलेले आवरण आणि जडपणा निघून गेला अन् मला एकदम हलके वाटले. गुरुदेवांनी मला यापुढील सेवा करण्यासाठी पुनर्जन्म दिला आहे. आता मी ‘माझे घर हाच ‘रामनाथी आश्रम’ आहे’, असा भाव ठेवून सर्व सेवा करते. गुरुदेव मला सेवा सुचवतात आणि माझ्याकडून सेवा करून घेतात.
९. मी सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करते. सद्गुरु सत्यवानदादा (सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम) अधूनमधून भेडशी गावात येतात. तेव्हा मला त्यांच्या ठिकाणी गुरुदेवांचे दर्शन होते.
हे सर्व गुरुदेवांनीच सुचवले आणि लिखाण करण्यासाठी मला स्फूर्ती दिली, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती सुहासिनी सुधाकर टोपले (वय ७२ वर्षे), भेडशी, जिल्हा सिंधुदुर्ग. (१३.४.२०२३)
|