शरद पवार आणि नैतिकता यांचा संबंध काय ? वसंतदादा पाटील यांचे सरकार कसे गेले ? – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (डावीकडे) आणि शरद पवार

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नैतिकता यांचा संबंध काय आहे ? शरद पवार हे जर भाजपला नैतिकता शिकवत असतील, तर इतिहासात जावे लागेल. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे सरकार कसे गेले ?, येथून प्रारंभ होईल. पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते सतत बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नसते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ मे या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना नैतिकतेच्या गोष्टी  सांगण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावून मते मिळवली आणि मुख्यमंत्रीपदाच्या आसंदीसाठी विचार, युती अन् पक्षही सोडला. नंतर हिंदुत्वाचा विचारही सोडला. सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाविषयीचा निकाल देतांना विधानसभेच्या अध्यक्षांना सर्वाधिकार दिलेले आहेत. त्यामुळे आता विधानसभेच्या अध्यक्षांवर कुणी दबाव आणत असेल, तर हे गंभीर आहे; पण महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष हे निष्णात अधिवक्ता आहेत. त्यामुळे ते विरोधकांच्या कुठल्याही दबावाला बळी पडणार नाहीत.

विधानसभेचे अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आला असेल, तर त्यांनी ढोल बडवावा.