मुसलमान मतदारांना खूश करण्‍यासाठी काँग्रेसचा बजरंग दलावर बंदी घालण्‍याचा घाट ! – विवेक कुलकर्णी, बजरंग दल

नगर जिल्‍हा विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दलाच्‍या वतीने काँग्रेसचा निषेध


नगर – काँग्रेसने जाहीरनाम्‍यात पी.एफ्.आय.सारख्‍या राष्‍ट्रद्रोही आणि कट्टर जिहादी मानसिकता असलेल्‍या संघटनेची तुलना बजरंग दलाशी केली आहे. मुसलमान मतदारांना खुश करण्‍यासाठी काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्‍याचा घाट घातला आहे. संपूर्ण देशाला बजरंग दल काय आहे ? हे ठाऊक आहे. बजरंग दलाने कधीही राज्‍यघटनेची चौकट ओलांडलेली नाही. सेवा, सुरक्षा, संस्‍कार या त्रिसूत्रीच्‍या आधारे बजरंग दलाचे कार्य चालू आहे, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे बजरंग दलाचे महाराष्‍ट्र गोवा क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकर्णी यांनी केले.

विवेक कुलकर्णी

कर्नाटक येथे काँग्रेसने निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर ‘बजरंग दलावर बंदी घालण्‍यात येईल’, असे जाहीरनाम्‍यात प्रसिद्ध केले आहे. याचा निषेध व्‍यक्‍त करण्‍यासाठी नगर जिल्‍हा विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने विवेक कुलकर्णी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्‍यात आली. त्‍या वेळी ते बोलत होते.

विवेक कुलकर्णी पुढे म्‍हणाले की, महाराष्‍ट्रातही माजी मुख्‍यमंत्री अशोकराव चव्‍हाण यांनी बजरंग दलाच्‍या बंदीची भाषा केली आहे. नांदेड येथे मुसलमान समाजकंटकांकडून दंगे होतात. पोलीस अधिकारी आणि पोलीस यांना मारहाण केली जाते. शासनाच्‍या संपत्तीची तोडफोड केली जाते. या वेळी अशोकराव चव्‍हाण कुठे गेले होते ? केवळ मतांच्‍या लांगूलचालनासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. हिंदु समाज मतदार आणि राजकीय दृष्‍ट्या सजग झाला आहे. काँग्रेसने आत्‍मपरीक्षण करावे. हिंदुद्वेषाचे राजकारण करत काँग्रेस स्‍वतःलाच संपवत आहे. वर्ष १९९८ मध्‍ये आतंकवाद्यांनी अमरनाथ यात्रा बंद पाडण्‍याचे षड्‌यंत्र रचले होते. त्‍या वेळेस बजरंग दलाचे ५० सहस्र कार्यकर्ते काश्‍मीरमध्‍ये आले आणि त्‍यांनी अमरनाथ यात्रा सुरळीत चालू केली.