‘द केरल स्टोरी’ चित्रपटावरील बंदीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार !

  • निर्माते विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचे विधान

  • तमिळनाडू आणि बंगालने घातली आहे बंदी !

  • उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार !

निर्माते विपुल शाह

मुंबई – ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तमिळनाडू आणि पश्‍चिम बंगाल येथील राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत बंदी घातली आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात येईल. आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊ, असे विधान या चित्रपटाचे निर्माते विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केले.

विपुल शाह म्हणाले की,

१. न्यायालयाने चित्रपटाला अनुमती दिल्यानंतर त्यावर बंदी घालायला तमिळनाडू आणि बंगाल सरकार कोण लागून गेले ? या बंदीविरुद्ध आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊ. आम्ही देशातील अत्यंत गंभीर समस्या या चित्रपटातून मांडली आहे.

२. देशातील नगारिकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला, त्याविषयी मी त्यांचे आभार मानतो. चित्रपटाचा विषय महत्त्वाचा असून तो अधिकाअधिक लोकापर्यंत जायला हवा. पंतप्रधानांनीही या चित्रपटावर भाष्य केले आहे. काहींनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी विरोध केला आहे.

३. तमिळनाडूमध्ये केवळ एका व्यक्तीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले गेले आहे. आमचा चित्रपट कोणताही समाज आणि जात यांच्या विरोधात नाही. हा केवळ आतंकवादाच्या विरोधात आहे. या चित्रपटावरून ज्याला राजकारण करायचे आहे, त्यांनी ते करावे. अंतिम उत्तर मात्र प्रेक्षकच देतात.

४. कर्नाटक निवडणुकीच्या काळातच हा चित्रपट का प्रदर्शित झाला ? या प्रश्‍नाचे उत्तर देतांना विपुल शाह म्हणाले, ‘‘आम्ही या चित्रपटावर ३ वर्षांपूर्वी काम करायला प्रारंभ केला होता. त्या वेळी आता कर्नाटकची निवडणूक होईल, याचा विचार केला नव्हता. या देशात निवडणुका होतच रहातात. याचा अर्थ आम्ही चित्रपट प्रदर्शित करू नये, असा होत नाही.’’