पुण्यातील बंडगार्डन परिसरात असलेल्या राजाबहादूर मिलच्या मैदानात प्रसिद्ध संगीतकार ए.आर्. रेहमान यांच्या कार्यक्रमाचे आयोजन (कॉन्सर्ट) करण्यात आले होते. मोठमोठ्या आवाजात गाणी चालू होती. हा कार्यक्रम रात्री १० वाजल्यानंतरही चालू होता. त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी स्वतः मंचावर जाऊन हा कार्यक्रम बंद करायला लावला. ‘रात्री १० वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता ?’, असे म्हणत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी ए.आर्. रेहमान यांना सुनावले. या प्रसंगातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सर्वच पोलीस कर्मचार्यांना, सामान्य जनतेला त्याचप्रमाणे सिनेजगतातील वलयांकित आणि प्रसिद्ध व्यक्तींना कायदा सुव्यवस्था राखण्याचा आदर्शच घालून दिला आहे.
‘रात्री १० ते सकाळी ६ या वेळत ध्वनीक्षेपकावर सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवू नयेत’, असा नियम असतांनाही अनेकदा त्याचे राजरोसपणे उल्लंघन होते. अनेकदा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत हे प्रकार होत असतात; परंतु नियमांची होत असलेली पायमल्ली रोखण्याचा प्रयत्न मात्र स्वतंत्र भारताचे सुजाण, जागरूक नागरिक (?) अथवा कर्तव्यदक्ष (?) पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून होतांना दिसत नाही. भूमी हादरवून सोडणार्या ध्वनीक्षेपकाच्या आवाजाने वृद्ध, आजारी, तसेच लहान मुले यांच्या हृदयाची धडधड वाढून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे धोके कुणाला ज्ञात नाहीत, असे नाही; पण स्वतःच्या सुखापुढे कुणाला त्रास वा इजा होणार नाही ना ? असा विचार मनात येतच नाही, हे दुर्दैवी आणि संतापजनक आहे. ही स्थिती डॉल्बीवर, गाणी वाजवून स्वतःच्या आनंदात रममाण होणार्यांची ! ज्यांना त्या आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो, तेही आपापल्या घरात धुसफुसत असतात; पण गैरप्रकार थांबवण्यासाठी मात्र कुणीही पुढे येत नाही. एखादाच हे थांबवण्यासाठी प्रयत्न करीलही; पण त्याला इतर कुणीही साथ देत नाहीत, मग संघटितपणे चुकीच्या गोष्टी थांबवणे तर दूरच राहिले.
सर्व परिस्थिती पहाता सत्यासाठी, नैतिकतेसाठी लढा द्यावा, असे अनेकांना वाटते; परंतु कृती होत नाही. अशा परिस्थितीत आपले कर्तव्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी ज्याप्रमाणे कृती केली, तशी कृती सर्वत्रच्या पोलिसांनी केल्यास जनतेलाही बळ मिळेल आणि समाज सुरक्षिततेकडे जाईल !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, फोंडा, गोवा.