परात्पर गुरु डॉ. आठवले, ‘आपण जिंकलात आणि आपणच साधकांना जिंकवत आहात’, हे चिरंतन सत्य आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘२६.६.२०२१ या दिवशी एका संतांनी भाववृद्धी सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेली ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो !’, ही कविता वाचून दाखवली. या कवितेत परात्पर गुरु डॉक्टर म्हणतात, ‘मोक्षप्राप्ती करण्याचे दोन मार्ग आहेत – एक म्हणजे देवयान मार्ग, जो सप्तलोकांतून जातो आणि दुसरा म्हणजे पितृयान मार्ग, जो सप्तपाताळांतून जातो. सध्या कलियुगात साधकांना मोक्षप्राप्ती करून घेण्यासाठी पितृयान मार्गाने जावे लागत आहे. त्यामुळे साधकांना वाईट शक्तींचे पुष्कळ त्रास होत असून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे; पण तरीही साधक आनंदाने ही परिस्थिती स्वीकारून अडचणींतून मार्ग काढत साधना करत आहेत. साधकांच्या जागी मी असतो, तर मी कधीच साधना सोडून गेलो असतो; पण साधकांची माझ्यावर श्रद्धा असल्याने ते चिकाटीने साधना करत आहेत. त्यामुळे साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो !’

ही कविता ऐकतांना माझा भाव जागृत झाला आणि त्यावर पुढील उत्तरे लिहिण्याची प्रेरणा मला मिळाली.

पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार प्रीती आणि अखंड कृपा यांमुळे साधक पितृयान मार्गात देवयान मार्गाची अनुभूती घेत आहेत ! 

सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये साधकांनी देवयान, म्हणजे सप्तलोकांतून जाणार्‍या मार्गाने साधना करून ईश्वरप्राप्ती केली; मात्र कलियुगात साधकांना पितृयान, म्हणजे सप्तपाताळांतून जाणार्‍या मार्गाने साधना करावी लागत आहे. प.पू. गुरुदेव, आपली अपार प्रीती आणि अखंड कृपा, यांमुळे आम्ही साधक पितृयान मार्गात देवयान मार्गाची अनुभूती घेत आहोत. हे भगवंता, आपण जिंकलात आणि आपणच आम्हाला जिंकवत आहात !

२. साधक अगणित चुका करत असूनही प.पू. गुरुमाऊली आईप्रमाणे साधकांना समजून घेत आहे !

आमच्या साधनाप्रवासात आम्ही आमचे स्वभावदोष आणि अहं यांमुळे अगणित चुका करतो अन् त्यामुळे नवीन अडथळे निर्माण करतो. प.पू. गुरुमाऊली, आई जशी सहिष्णु आणि समजूतदार असते, तसे आपण मातेप्रमाणे आम्हाला समजून घेत आहात. आम्हाला साधनेपासून इतरत्र कुठेही भरकटू देत नाही. हे देवा, आपण जिंकलात आणि आपणच आम्हाला जिंकवत आहात !

३. आम्हाला (साधकांना) अनिष्ट शक्तींचे त्रास होतात; परंतु आपल्या अमर्यादित प्रीतीमुळे तुम्ही आमचे सर्व त्रास स्वतःवर घेऊन आम्हाला अनेक वेळा जीवनदान दिले आहे. हे प्रभो, आपण जिंकलात आणि आपणच आम्हाला जिंकवत आहात !

४. ‘सर्वकाही माझ्या गुरूंच्या कृपेने होत आहे’, असे म्हणणार्‍या प.पू. गुरुदेवा, तुमच्यापेक्षा आदर्श शिष्याचे उदाहरण शोधून तरी सापडेल का ? 

तुम्ही साक्षात् परमेश्वर, सच्चिदानंद परब्रह्म आहात, तरीही तुम्ही म्हणता, ‘माझी काहीच क्षमता नाही. हे सर्व माझ्या गुरूंच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) कृपेमुळे होत आहे.’ आपल्यापेक्षा आदर्श शिष्याचे उदाहरण आम्हाला शोधून तरी सापडेल का ? हे परमेश्वरा, आपण जिंकलात आणि आपणच आम्हाला जिंकवत आहात !

५. साधकांना जीवनात कितीही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी संरक्षणाची शक्ती साधकांनी स्वतःभोवती सातत्याने अनुभवली आहे !

आम्हा साधकांच्या जीवनात पुष्कळदा कठीण प्रसंग आले. काही वेळा आम्ही अपमान, अवहेलना आणि अयोग्य वर्तवणूकही सहन केली; पण आपल्या दैवी संरक्षणाची शक्ती आम्ही आमच्याभोवती सातत्याने अनुभवली आहे. त्यातून आम्हाला नेहमीच प्रारब्ध भोगण्याची आंतरिक शक्ती मिळाली आहे. एवढेच नव्हे, तर जसे सोने अग्नीतून काढल्यावर त्याचे तेज वाढते, तसे आम्हीही अशा प्रसंगांतून सुरक्षित बाहेर पडलो आणि झळाळून निघालो. हे प.पू. गुरुमाऊली, आपण जिंकलात आणि आपणच आम्हाला जिंकवत आहात !

६. साधकांना साधनाप्रवासात पुढे घेऊन जाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचे सगुण रूप असलेले अनेक सद्गुरु आणि संत मार्गदर्शक म्हणून दिले आहेत !

प.पू. गुरुदेव, ‘तुमच्याविना आमचे कसे होईल ?’, या विचाराने आम्ही चिंतित होतो; मात्र आपणच आम्हाला व्यक्तीनिष्ठ रहाण्यापेक्षा तत्त्वनिष्ठ रहाण्याचे महत्त्व शिकवले आहे. त्याच समवेत तुम्ही आम्हाला साधनाप्रवासात पुढे घेऊन जाण्यासाठी आपले सगुण रूप असलेले अनेक सद्गुरु आणि संत मार्गदर्शक म्हणून दिले आहेत. आपल्याच कृपेने आम्हाला श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदामाता (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) आणि श्रीचित्‌शक्ति सौ. अंजलीमाता (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) लाभल्या आहेत. हे सत्यनारायणस्वरूप गुरुदेवा, आपण जिंकलात आणि आपणच आम्हाला जिंकवत आहात !

७. प.पू. डॉ. आठवले यांनी साधकांसाठी सर्वस्वाचा त्याग केला असून ‘तेच साधकांची सेवा करत आहेत’, याची अनुभूती साधक घेत आहेत !

प.पू. गुरुदेव, तुम्ही आम्हा साधकांसाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे. विठ्ठलाने ‘श्रीखंड्या’ नावाचा चाकर बनून संत नामदेवांच्या घरी त्यांची सेवा केल्याची कथा आम्ही ऐकली आहे. त्याचप्रमाणे ‘आपणच आमची सेवा करता’, हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवत आहोत. आम्ही आपले अखंड स्मरण करण्यात न्यून पडतो; पण आपली आमच्यावर निरपेक्ष प्रीती असल्याने आपणच आमचे अखंड स्मरण करत असता. हे विष्णुस्वरूप गुरुदेवा, आपण जिंकलात आणि आपणच आम्हाला जिंकवत आहात !

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची स्तुती करण्यास साधक असमर्थ आहेत !

आपल्या दैवी लीला अनंत आहेत. आपले आणि साधकांचे नाते जन्मोजन्मींचे आहे. आपली करुणा आणि प्रीती अमर्याद आहे. प्रत्यक्ष आदिशेष स्वतःच्या सहस्र फण्यांनी आपली स्तुती करायला असमर्थ आहे. त्यामुळे तुमची स्तुती करणे आमच्यासाठी अशक्यप्राय आहे. हे श्रीरामस्वरूप गुरुदेवा, आपण जिंकलात आणि आपणच आम्हाला जिंकवत आहात !

‘प.पू. गुरुदेव, तुम्ही आम्हाला ‘आपण कसे हरलात आणि साधक कसे जिंकले ?’, याची ५ कारणे सांगितली, तर आम्ही ‘आपण कसे जिंकलात अन् आपणच आम्हाला कसे जिंकवत आहात ?’, याची ५ सहस्र कारणे सांगू ! त्या वेळी आपण मनमोहक स्मित करत म्हणाल, ‘‘आता यात मी हरलो आणि तुम्ही जिंकलात !’’ हे श्रीकृष्णस्वरूप गुरुदेव, ‘आपण जिंकलात आणि आपणच आम्हाला जिंकवत आहात’, हे चिरंतन सत्य आहे.’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन् (सनातनच्या ७० व्या संत, वय ५७ वर्षे), चेन्नई (२६.६.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक