छत्रपती संभाजीनगर येथे ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला महिला आणि तरुणी यांचा उदंड प्रतिसाद !

महिला प्रेक्षकांना भगव्या टोप्या वाटल्या !

द केरल स्टोरी’ चित्रपट पहाण्यासाठी उपस्थित असलेल्या महिला-तरुणी

छत्रपती संभाजीनगर – ७ मे या दिवशी सकाळी ८ वाजता सेव्हन हिल्स परिसरातील ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झालेल्या चित्रपटगृहाचे प्रांगण हिंदु महिला-तरुणी यांनी भरले होते. या चित्रपटाला महिला आणि तरुणी यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचे आयोजन करणार्या आयोजकांनी महिला आणि तरुणी यांना भगव्या टोप्यांचे विनामूल्य वाटप केले.

‘द केरल स्टोरी’ चित्रपटानंतर आयोजकांनी व्याख्यान देत ‘मुसलमानांच्या दुकानातून वस्तू खरेदी करू नका, काही मुसलमानबहुल वस्तीच्या परिसरात जाऊ नका आणि भगवे स्कार्फ वापरा, असे आवाहन केले, तसेच भगव्या टोप्या घालून छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर ठेवा, चंद्रकोरीची टिकली लावा, असेही सांगितले. ७० सहस्र रुपये व्यय करून पुढील ८ दिवसांसाठी या चित्रपटाची तिकिटे खरेदी करून ती विनामूल्य वाटली जात आहेत. सकाळचा खेळ असला, तरी हा चित्रपट भरगच्च (हाऊसफुल्ल) होता. विनामूल्य घरपोच तिकिटे वाटण्यात आल्याने अनेक तरुणी आणि महिला उपस्थित होत्या. त्यांनी भगव्या टोप्या घालूनच चित्रपट पाहिला.

हा माझा वैयक्तिक उपक्रम !

हा माझा वैयक्तिक उपक्रम आहे. याचा भाजपशी काहीच संबंध नाही. समाजात जागृती आणण्यासाठी आम्ही हे करत आहोत. आम्ही ७० सहस्र रुपये व्यय करून पुढील ८ दिवसांसाठी या चित्रपटांची नोंदणी केली आहे. – श्री. राहुल बोरूळे, आयोजक, ‘द केरल स्टोरी’ चित्रपट