इंद्रायणीतील प्रदूषण रोखण्‍यासाठी ‘इंद्रायणी सेवा फाउंडेशन’चे आळंदीत साखळी उपोषण !

आळंदी (जिल्‍हा पुणे) – इंद्रायणी नदीचे संवर्धन आणि पात्रातील प्रदूषण रोखण्‍यासाठी, तसेच ते करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्‍यासाठी येथील संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या समाधी मंदिरासमोर महाद्वारात साखळी उपोषण चालू केले आहे. आळंदीतील ‘इंद्रायणी सेवा फाउंडेशन’चे अध्‍यक्ष विठ्ठल शिंदे आणि सहकारी यांनी १ मेपासून चालू केलेल्‍या उपोषणास आळंदीकर ग्रामस्‍थ आणि वारकरी, तसेच विविध पक्ष, तसेच संघटना यांनी पाठिंबा दिला आहे.

शिंदे यांनी सांगितले की, गेली काही वर्षे इंद्रायणी नदीपात्रात उगमापासून ते संगमापर्यंतच्‍या ९० हून अधिक कि.मी.च्‍या अंतरावरील गाव, शहरे यांच्‍याकडून मैलायुक्‍त सांडपाणी सोडले जाते. काही रासायनिक प्रदूषणही कारखान्‍यांकडून केले जाते. याविषयी संस्‍थेच्‍या माध्‍यमातून ३ ते ४ वर्षांपासून जलप्रदूषण रोखण्‍यासाठी जनजागृती केली. जलप्रदूषणावर कायमस्‍वरूपी उपाययोजना राबवण्‍यासाठी, प्रशासनाचे लक्ष वेधण्‍यासाठी उपोषण चालू केले आहे. प्रशासनाकडून ठोस आश्‍वासन मिळेपर्यंत उपोषण चालूच राहील. यासाठी मंत्रालय स्‍तरावर, तसेच जिल्‍हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिका आणि स्‍थानिक पोलीस प्रशासन यांच्‍या समवेत पत्रव्‍यवहार केला आहे.

संपादकीय भूमिका

असे उपोषण का करावे लागते ? प्रशासन स्‍वतः हून या प्रकरणी लक्ष घालून इंद्रायणीतील प्रदूषण रोखत का नाही ?