साधिकेला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ७८ व्‍या जन्‍मोत्‍सव सोहळ्‍याविषयी काही कल्‍पना नसतांनाही त्‍यांच्‍या कृपेने तिला आलेल्‍या अनुभूती

वैशाख कृष्‍ण सप्‍तमी या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा वाढदिवस असतो. वर्ष २०२० मध्‍ये असलेल्‍या त्‍यांच्‍या ७८ व्‍या जन्‍मोत्‍सव सोहळ्‍याविषयी मला काहीच कल्‍पना नव्‍हती; मात्र त्‍यासंदर्भात मला एक सप्‍ताह आधीपासूनच त्‍यांच्‍याच अपार कृपेने येत असलेल्‍या अनुभूतींची भावपुष्‍पे त्‍यांच्‍या चरणी अर्पण करते.

सौ. सोहा देव

१. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पहिल्‍या पृष्‍ठावरील ‘परात्‍पर गुरु डॉ आठवले यांचे तेजस्‍वी विचार’ या मथळ्‍याखालील त्‍यांचे छायाचित्र पाहिल्‍यावर त्‍यांची मुखकांती आणि केस सोनेरी दिसत होते.

२. पहाटे झोपेत असतांना सूक्ष्मातून ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले आले आहेत’, असे जाणवणे आणि त्‍यांनी साधना होण्‍याकडे लक्ष द्यायला सांगणे 

अक्षय्‍य तृतीया झाल्‍यानंतर एकदा पहाटे मी झोपेत असतांना सूक्ष्मातून ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले आले आहेत’, असे मला जाणवले. त्‍या वेळी मला पुष्‍कळ आनंद झाला. मी ‘ते खरंच आले आहेत का ?’, या संभ्रमात होते. तेव्‍हा ते मला म्‍हणाले, ‘तू जशी मला सूक्ष्मातून भेटायला येतेस, तसा मी तुला सूक्ष्मातून भेटायला आलो आहे.’ त्‍यांनी मला भूतकाळात घडलेला एक प्रसंग दाखवून साधना होण्‍याकडे लक्ष द्यायला सांगितले. त्‍यानंतर मला जाग आली. ‘माझी साधनेत प्रगती व्‍हावी’, अशी तळमळ असलेले गुरु मला या जन्‍मी लाभले’, त्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञ आहे.

३. संस्‍कृत भाषेतील ‘दण्‍डकम्’ ऐकू येणे अणि ‘महासरस्‍वतीदेवी तिच्‍या चैतन्‍यवाणीतून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे स्‍तुतीगान करत आहे’, असे जाणवणे

७.५.२०२० या दिवशी वैशाख पौर्णिमा होती. त्‍या दिवशी पहाटे मला ‘संस्‍कृत भाषेतील ‘दण्‍डकम्’ (टीप) ऐकू येत आहे’, असे जाणवले. (टीप : संस्‍कृत, तेलुगू आणि कन्‍नड भाषांतील छंदोबद्ध रचना) ‘ते माझ्‍या अंतर्मनात जाऊन पुन्‍हा बाहेर पडत आहे’, असे जाणवत होते. त्‍याची स्‍पंदने आल्‍हाददायक आणि चैतन्‍यमय होती. ‘महासरस्‍वतीदेवी तिच्‍या चैतन्‍यवाणीतून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे स्‍तुतीगान करत आहे’, असे मला वाटले. (‘श्‍यामलादण्‍डकम्’ हे महाकवी कालिदासाने सरस्‍वतीदेवीविषयी रचलेले दण्‍डक आहे.) त्‍यामुळे मी भारावून गेले. माझ्‍या मनात विचार आला, ‘देवी जे सांगत आहे, ते त्‍वरित लिहून घेऊया.’ मी डोळे उघडले. तेव्‍हा मला शेवटचे दोनच शब्‍द आठवत होते अन् तेही आकलन होण्‍यापूर्वीच मी विसरून गेले. त्‍यामुळे दिवसभर माझी तगमग वाढली होती. ‘वागीश्‍वरीदेवी ज्ञानदान करून मला सेवेची संधी देत होती; पण मला ते ग्रहण करता आले नाही’, याची मला खंत वाटत होती. मी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना यातून ‘तुम्‍हाला मला काय शिकवायचे आहे ?’, याचे मला आकलन होऊ दे आणि ईश्‍वरेच्‍छा म्‍हणून माझ्‍याकडून सेवा, साधना करून घ्‍या’, अशी प्रार्थना करून माझ्‍या दिनचर्येला आरंभ केला. गुरुदेवा, माझ्‍यात ज्ञान, भक्‍ती आणि सेवाभाव धारण करण्‍याची क्षमता नाही, तरीही तुम्‍ही मला अशी अनुभूती दिलीत, त्‍याबद्दल मी तुमच्‍या चरणी कृतज्ञ आहे.

४. हनुमानाला प्रार्थना केल्‍यावर त्‍याचे अस्‍तित्‍व जाणवणे आणि त्‍याने देहावरील त्रासदायक आवरण दूर केल्‍याने हलकेपणा जाणवणे

८.५.२०२० या दिवशी रात्री प्रार्थना करून झोपत असतांना मला हनुमानाचे स्‍मरण झाले; म्‍हणून मी त्‍याला प्रार्थना केली आणि झोपले. दुसर्‍या दिवशी पहाटे ३.३० वाजता मला जाग आल्‍यावर मी उठून सर्व आवरले आणि बसून नामजप करत होते. त्‍या वेळी एक घंट्याने मला हनुमान देवतेचे सूक्ष्मातून अस्‍तित्‍व जाणवले. ‘मी रात्री केलेल्‍या प्रार्थनेला ‘ओ’ देत हनुमान आला आहे’, असे जाणवून मी त्‍याच्‍या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्‍यक्‍त केली, ‘हे हनुमाना, तू श्रीरामाचा भक्‍तशिरोमणी आहेस. मला स्‍थुलातून कोणी मार्गदर्शक नाही. ‘नामजप, प्रार्थना आणि आत्‍मनिवेदन करणे अन् शरणागतभावात रहाणे’, हीच माझ्‍याकडे साधने आहेत. मी तुला शरण आले आहे.’

तेव्‍हा मला जाणवले, ‘हनुमानाने माझ्‍या देहातील सर्व व्‍याधी चैतन्‍याच्‍या कुंचल्‍याने दूर केल्‍या. त्‍याने माझ्‍या प्रत्‍येक पेशीमध्‍ये नवचेतना आणि भक्‍तीभाव यांचे अत्तर मिसळले. नंतर तो मला म्‍हणाला, ‘आता चित्त बघूया.’ तेव्‍हा माझ्‍यातील नामजपाचे केंद्र श्रीकृष्‍णाचा नामजप करत होते, तर ज्ञानाचे केंद्र मिळेल ते ज्ञान ग्रहण करण्‍यात गर्क होते. माझ्‍या देहात काही ठिकाणी अंधार होता, तर अन्‍य ठिकाणी अनावश्‍यक संस्‍कार विखुरले होते. हनुमानाने ते शुद्ध सात्त्विक संस्‍काराने सारवले. हनुमानाच्‍या अस्‍तित्‍वामुळे माझ्‍यावरील त्रासदायक आवरण दूर झाले. मी हनुमानाला म्‍हणाले, ‘तू आहेस; म्‍हणून हे सर्व शक्‍य झाले. मी तुझ्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते. मी नियमित साधना करीन.’ मी हनुमानाला नमस्‍कार केला. माझ्‍या देहावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण दूर झाल्‍यानेे मला २ दिवस हलकेपणा जाणवत होता.

५. स्‍वप्‍नात ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या दिव्‍य चरणकमलांवर नतमस्‍तक झाले आहे’, असे दिसणे 

१०.५.२०२० या दिवशी पहाटे ३.३० वाजता मला स्‍वप्‍नात दिसले, ‘मी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या दिव्‍य चरणकमलांवर नतमस्‍तक झाले आहे. मी डोळे उघडल्‍यावर मला त्‍यांच्‍या चरणांच्‍या उजव्‍या बाजूला सुवर्णाची गदा दिसली. त्‍या गदेतील स्‍पंदनांमुळे ‘आज मारुतिराया पंचमुखी स्‍वरूपात पुन्‍हा आला आहे’, असे वाटून मी वर पाहिले. मारुतिराया विराट रूपात असल्‍यामुळे मला त्‍याचे मुख दिसत नव्‍हते; म्‍हणून मी माझे मस्‍तक त्‍याच्‍या चरणांवर ठेवले. त्‍या वेळी ‘माझे मस्‍तक आणि पाठ यांच्‍यावर कमलदलांसारखा मृदू स्‍पर्श होत आहे’, असे मला जाणवले. तेव्‍हा मला आनंदाची अनुभूती येत होती. माझ्‍या मनात विचार आला, ‘हे नेमके कुठले दिव्‍य तत्त्व आहे ?’ मी वर पहाण्‍यासाठी डोळे उघडले, तर एखाद्या चलचित्राप्रमाणे मला चरणांवर कधी परात्‍पर गुरु डॉ. आठवले, कधी श्रीकृष्‍ण, कधी महासरस्‍वती, कधी श्रीगणेश, कधी श्रीराम, तर कधी हनुमान यांचे चरण दिसत होते. त्‍या चरणकमलांचे आकारमान सारखेच आहेे. केवळ प्रत्‍येक देवतेच्‍या तत्त्वानुसार स्‍पंदने किंवा वर्ण पालटत आहेत. मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या करुणामय कृपेमुळे एकाच ठिकाणी या देवतांच्‍या दिव्‍य चरणांचे दर्शन झाले. त्‍यांचा उपकारक स्‍पर्श जाणवला आणि मला त्‍यांची पादसेवा करण्‍याची संधी मिळाली; म्‍हणून मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त केली. मी वर पाहिले, तर त्‍या ठिकाणी मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीमहाविष्‍णूच्‍या विराट रूपात दर्शन झाले. त्‍यांचे मुखकमल पुष्‍कळ तेजस्‍वी आणि प्रसन्‍न दिसत आहे. ते स्‍मितहास्‍य करत कृपेचा वर्षाव करत आहेत.’

६. ऑस्‍ट्रेलियात सोनचाफ्‍याच्‍या झाडाला उन्‍हाळ्‍यात बहर येत असतांना गुरुदेवांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त त्‍या झाडाला हिवाळ्‍यातही बहर येणे

६ अ. वायुदेवतेने सुगंधाच्‍या माध्‍यमातून ‘सोनचाफ्‍याच्‍या झाडाला फुले आली आहेत’, याची जाणीव करून देणे : १०.५.२०२० या दिवशी येथे (ऑस्‍ट्रेलियात) थंडी असल्‍यामुळे मी दुपारी अंगणात उन्‍हात उभी होते. तेव्‍हा मला सोनचाफ्‍याच्‍या फुलांचा सुगंध येत होता. माझे यजमान मला म्‍हणाले, ‘‘सोनचाफ्‍याच्‍या झाडाला हिवाळ्‍यात बहर येतो का ? मार्गालगतच्‍या सोनचाफ्‍यांच्‍या झाडाला आता बहर आलेला दिसत आहे.’’ मला त्‍यांचे बोलणे ऐकून आश्‍चर्य वाटले; कारण खरेतर ऑस्‍ट्रेलियात उन्‍हाळ्‍यात सोनचाफ्‍याच्‍या फुलांना बहर येतो.

मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाविषयीचा लेख वाचला. तेव्‍हा माझ्‍या मनात विचार आला, ‘त्‍यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या दिवशी त्‍यांच्‍या प्रतिमा पूजनासाठी हीच फुले आणूया.’ मी बरेच दिवस बाहेर गेले नाही. त्‍यामुळे ‘सोनचाफ्‍याच्‍या झाडाला बहर आला आहे’, हे मला ठाऊक नव्‍हते; परंतु वायुदेवतेने सुगंधाच्‍या माध्‍यमातून मला याची जाणीव करून दिली.

६ आ. सोनचाफ्‍याची फुले खुडायला गेल्‍यावर फुलांना आनंद होणे : १३.५.२०२० या दिवशी मी सोनचाफ्‍याची फुले खुडायला गेले. तेव्‍हा सर्वच फुले आनंदाने ‘मला घे, मला घे’, असे म्‍हणू लागली. मी हाताला लागतील ती टवटवीत फुले खुडत होते. तेव्‍हा त्‍यातील काही किंचित् कोमेजलेली फुले मला म्‍हणाली, ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी अर्पण व्‍हायचे, यासाठी आम्‍ही उतावीळपणाने आणि उत्‍साहाने कालच उमलून बसलो आहोत. तू आम्‍हाला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणांखाली पसरवून ठेव.’ मला त्‍यांच्‍यातील भाव पाहून आश्‍चर्य वाटले. सोनचाफ्‍याचे झाडही म्‍हणाले, ‘आम्‍हाला उन्‍हाळ्‍यात फुलांचा बहर येतो; पण आम्‍ही कठीण साधना करून ६ मास आधीच आलो आहोत.’

६ इ. दुसर्‍या दिवशी निर्माल्‍य काढायला गेल्‍यावर ‘फुले अल्‍प प्रमाणात कोमेजली आहेत’, असे लक्षात येणे : त्‍या वेळी माझ्‍या मनात विचार आले, ‘ही फुले निश्‍चितच साधना करणारे जीव आहेत. त्‍यांनी तळमळीने साधना करून जलद आध्‍यात्मिक उन्‍नती करून घेतली. ती फुले श्री गुरूंचे चैतन्‍यमय सान्‍निध्‍य मिळवून मुक्‍त होणार आहेत.’ मी दुसर्‍या दिवशी निर्माल्‍य काढायला गेले, तर फुले अल्‍प प्रमाणात कोमेजली होती आणि त्‍यांनी मला सांगितले, ‘आम्‍हाला इथे अजून जरा वेळ राहू दे.’ तेव्‍हा मी ‘बरं’ म्‍हणाले. त्‍या फुलांनी रात्री मला हाक मारली आणि म्‍हणाली, ‘ही माळ प्रतिमेच्‍या खाली काढून ठेव. आम्‍ही त्‍यातील चैतन्‍य ग्रहण केले आहे. तू त्‍याचा सुगंध घे. आम्‍हाला रात्रभर इथेच ठेव आणि सकाळी विसर्जित कर.’

७. प्रार्थना आणि कृतज्ञता

मला जाणवले, ‘हे सर्व दैवी नियोजनाप्रमाणे घडत आहे.’ ‘गुरुदेवा, माझ्‍यातही अशीच तळमळ येऊ दे’, अशी मी तुमच्‍या चरणी प्रार्थना करते. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी मला निर्गुणातून सतत मार्गदर्शन केले’, त्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञ आहे. माझे चित्त तुमच्‍या चरणी स्‍थिर झाले आहे. ‘ते असेच निर्लेप, निर्विकल्‍प, निर्मळ आणि भावभक्‍तीसाठी, संतसेवेसाठी तत्‍पर असू दे’, अशी तुमच्‍या चरणी प्रार्थना करते.

श्रीकृष्‍णार्पणमस्‍तु !’

– सौ. सोहा देव, सिडनी, ऑस्‍ट्रेलिया. (१६.५.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक