‘बसस्थानक स्वच्छ’ अभियानात व्हिडिओद्वारे प्रवाशांपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पोचवणार !

सुराज्य अभियानाच्या आवाहनाला एस्.टी. महामंडळाचा सकारात्मक प्रतिसाद !

मुंबई – राज्यातील बसस्थानके स्वच्छ करण्यासाठी एस्.टी. महामंडळाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक’ हे अभियान महाराष्ट्रदिनाच्या दिवशी घोषित केले आहे. या अभियानाच्या अंतर्गत प्रवाशांपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पोचवण्यासाठी एस्.टी. महामंडळाने ‘एक मिनिट स्वच्छतेसाठी…, एक मिनिट महाराष्ट्रासाठी’ हा व्हिडिओ बनवला आहे. प्रवाशांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून राज्याचे परिवहनमंत्री एकनाथ शिंदे आणि एस्.टी. महामंडळ यांना करण्यात आले होते. याला परिवहन विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाने १० एप्रिल या दिवशी एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन एस्.टी. महामंडळाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घोषित केलेली बसस्थानक स्वच्छता मोहीम राज्यात योग्य प्रकारे राबवण्यात येत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या वेळी ‘एस्.टी. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा आणि प्रवाशांना स्वच्छतेचे आवाहन करणारा व्हिडिओ सिद्ध करून प्रत्येक बसस्थानकावरील दूरदर्शन संचावर त्याचे प्रक्षेपण करण्यात यावे’, अशी सूचना करण्यात आली होती. राज्यातील मुख्य १६ बसस्थानकांच्या अस्वच्छतेची छायाचित्रेही शेखर चन्ने यांना सादर करण्यात आली होती. बसस्थानकांची नियमितपणे स्वच्छता होण्यासाठी विविध उपाययोजना सुराज्य अभियानाकडून सुचवण्यात आल्या होत्या, तसेच त्यामध्ये सहकार्य करण्याचेही आश्‍वासनही सुराज्य अभियानाकडून देण्यात आले होते, अशी माहिती सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्परतेने व्हाव्यात ! – अभिषेक मुरुकटे, समन्वयक सुराज्य अभियान

स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा व्हिडिओ बनवण्यासह बसस्थानकांवर पुरेशा कचराकुंड्या ठेवणे, ‘कचरा कचराकुंडीतच टाकावा’, ‘भिंतीवर थुंकू नये’, आदी आवश्यक सूचना लावणे, उद्घोषणेद्वारे प्रवाशांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करणे,  स्वच्छतेसाठी प्रत्येक बसस्थानकावर उत्तरदायी व्यक्तीची नियुक्ती करणे, ठेकेदाराकडून स्वच्छता होत नसल्यास दंडात्मक कारवाई करणे, स्वच्छता मोहिमेची कार्यवाही परिणामकारकपणे होण्यासाठी आठवड्यातून एकदा मोहिमेचा आढावा घेणे, बसस्थानकांच्या स्वच्छतेची अचानक पहाणी करणे, सामाजिक संस्था, महाविद्यालयांतील विद्यार्थी, समाजसेवक यांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेणे आदी विविध उपाययोजनाही सुराज्य अभियानाकडून सुचवण्यात आल्या होत्या. यांतील आवश्यक आणि उपयुक्त वाटणार्‍या सूचनांचाही एस्.टी. महामंडळाने विचार करावा आणि बसस्थानके स्वच्छ होण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी.