एस्.टी.चे रूप पालटण्याचा महाराष्ट्र शासनाचा संकल्प ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्यात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सुंदर बसस्थानक अभियाना’ चा शुभारंभ !

मुंबई – एस्.टी. ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एस्.टी.ने अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी. एस्.टी.चे रूप पालटण्याचा राज्यशासनाने संकल्प सोडला आहे. शासन सदैव एस्.टी. महामंडळाच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने राज्यात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सुंदर बसस्थानक अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम पार पडला.

या वेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ई-शिवनेरी बस’चे लोकार्पण करण्यात आले. एस्.टी.चे ‘सदिच्छादूत’ म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा या वेळी करण्यात आली. सध्या मुंबई-ठाणे-पुणे या मार्गे १०० शिवनेरी इलेक्ट्रिक गाड्या धावणार असल्याची माहिती देण्यात आली.

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘एस्.टी. ची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानकांचा परिसर आणि प्रवासी गाड्या या स्वच्छ आणि टापटीप असाव्यात, यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात अभियान राबवण्यात येईल. यातून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक असावे, ही प्रवाशांची अपेक्षा आहे.’’

स्वच्छ सुंदर बसस्थानक ही प्रवाशांची अपेक्षा !

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात एस्.टी. ही अमृत महोत्सवी वर्षात वाटचाल करत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वी कच्च्या रस्त्यांवरही एस्.टी. पोचायची. आता पक्के रस्ते झाल्यानंतरही एस्. टी. महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एस्.टी.ची सेवा अधिक लोकाभिमुख व्हायला हवी; कारण एस्.टी.ला जनसेवेची परंपरा आहे. ‘प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे’, हा त्यामागचा उद्देश आहे. प्रवाशांच्या एस्.टी.कडून तशा अपेक्षा आहेत, असे या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

एस्.टी.च्या नियमित प्रवाशांची संख्या १० लाखांपर्यंत पोचली आहे ! – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एस्.टी. महामंडळ

कोरोनाच्या काळातही एस्.टी. महामंडळाने कामगिरी पार पाडली आहे. एप्रिल २०२२ मध्ये एस्.टी.ने नियमित प्रवास करणार्यांची संख्या ३ लाख होती. सद्यस्थितीत ही संख्या १० लाखांपर्यंत पोचली आहे. या वेळी सदिच्छादूत मकरंद अनासपुरे यांनी ‘एस्.टी.चा कारभार सर्वांपर्यंत पोचेल याचे दायित्व मी घेईन’, असे सांगितले. या वेळी ‘एक मिनिट स्वच्छतेसाठी, एक मिनिट महाराष्ट्रासाठी’ या दृकश्राव्य संदेशाचे, तसेच एस्.टी.च्या वाटचालीचा आढावा घेणार्या लघुपटाचे प्रसारण करण्यात आले.