ठाणे येथील ऐतिहासिक नागला बंदर गड खाणमालकांकडून नामशेष ! – पुरातत्व विभाग

ठाणे – शहरातील नागला बंदर येथील ऐतिहासिक गड दगडखाणी आणि ‘क्रशर’ यंत्राच्या कामांमुळे नामशेष झाला आहे. राज्य शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडून गड नामशेष झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘नागला बंदर गड हे राज्य संरक्षित स्मारक नाही. यामुळे तो गड वाचवण्यासाठी महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराणवस्तू शास्त्र विषयक स्थळे अन् अवशेष या अधिनियमान्वे कारवाई करण्यास अडचणी येत आहेत’, असे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे म्हणणे आहे.

गडाचा इतिहास !

वसई मोहिमेवर निघालेले चिमाजी आप्पा यांनी ठाणे येथील नागला गड पोर्तुगिजांच्या कह्यातून जिंकला आणि त्यानंतर वसई मोहीम फत्ते केली होती.

गडाची दुरवस्था !

मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा हा गड आता नामशेष झाला आहे. ठाणे खाडी किनार्‍यावरील नागला बंदराच्या रक्षणासाठी बाजूच्या टेकडीवर बांधलेला हा गड दगडखाणींच्या विळख्यात सापडला आहे. अवैधरित्या खाणकाम करणार्‍यांनी गडाच्या भिंती आणि परिसर पूर्णपणे नष्ट केला आहे. ज्या ठिकाणी गड होता, त्या ठिकाणी केवळ भग्न अवस्थेतील २ भिंती असून त्या भिंतींवरच खडी क्रशरसाठी लागणारे साहित्य आणि भंगार सामान ठेवले आहे. नागला बंदर गडाच्या आसपासची भूमी दगडखाणींच्या मालकांनी अवैधरित्या कह्यात घेतली आहे. कोणतीही अनुमती न घेता गड ज्या डोंगरावर आहे, तो डोंगर पार पोखरण्यात आला आहे. डोंगर फोडून दगड आणि त्याचा चुरा विकला जात आहे. तेथे पर्यावरणाशी संबंधित अनेक नियमांचे उघडपणे उल्लंघन चालू आहे. यामुळे आसपासच्या परिसरात धूळ आणि धुराचे साम्राज्य पसरले आहे. खडी क्रशरमुळे नागरिकांमध्ये श्‍वसनाशी संबंधित आजार बळावले आहेत.

गड नष्ट करणार्‍या भूमाफियांवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे नोंदवावेत ! – आमदार प्रताप सरनाईक

आमदार प्रताप सरनाईक

लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातील ऐतिहासिक गड मी नष्ट होऊ देणार नाही. तो पुनजीर्वित करण्यासाठी मी प्रयत्न करत रहाणार आहे. अशा प्रकारे गड नष्ट करणार्‍या भूमाफियांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करावेत, तसेच रहिवाशांच्या आरोग्याला धोकादायक ठरणार्‍या अवैध दगडखाणी बंद करण्यात याव्यात. हा गड ऐतिहासिक वास्तू असून तो पुनजीर्वित करण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी केली आहे.

संपादकीय भूमिका

यास उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा दिली पाहिजे !