परम पूज्यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपादृष्टीने जाहले चराचर धन्य ।

प.पू. गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १७.५.२०२२ या दिवशी मला सुचलेली कविता पुढे दिली आहे.

डॉ. श्रीपाद पेठकर

परम पूज्यांच्या (टीप) संकल्पाने शुद्ध जाहली अवघी सृष्टी ।
सगुण निर्गुणाने अनुभवली गुरुकृपेची वृष्टी ।। १ ।।

परम पूज्यांच्या कृपादृष्टीने जाहले चराचर धन्य ।
गुरुदेवांच्या प्रीतीमुळे साधकांचे फळा आले पुण्य ।। २ ।।

परात्पर गुरूंचा एक कटाक्ष साधकांना करी आश्वस्त ।
गुरुदेवरूपी कल्पवृक्षाखाली साधक राही स्वस्थ ।। ३ ।।

नका होऊ चिंतातूर, परम पूज्य आहेत पाठी ।
मुक्त करती अवघ्या जिवा,
सोडवूनी जन्मोजन्मींच्या गाठी ।। ४ ।।

असे दिव्य चरण पामरा लाभले, हिच आमुची श्रीमंती ।
क्षण हे अनमोल अनुभवूया, सोडून मायेची आसक्ती ।। ५ ।।

परम पूज्य गुरुवरचरणी एकच असे मागणे ।
नको आम्हाला हे त्रिशंकूसम जिणे ।। ६ ।।

तव पावन चरणकमली स्थिर करा अवघ्या जिवा ।
श्वासोच्छ्वासी करून घ्यावा गुरुनामाचा धावा  ।। ७ ।।

थांबून जावो आता आमुचे मायेतील घुटमळणे ।
तव चरणी स्थिर व्हावे हे देहधारी बुजगावणे ।। ८ ।।

पुनरपि जन्म, पुनरपि मरण, थांबावी ही येरझार ।
प्रार्थितो तुम्हा आम्ही क्षुद्र जीव
करूनी साष्टांग नमस्कार ।। ९ ।।

टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

– डॉ. श्रीपाद व्यंकटेश पेठकर (वय ६१ वर्षे), पंढरपूर (२१.५.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक