साधना करण्यासाठी अध्यात्माची माहिती असणे आवश्यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अध्यात्म’ आणि ‘साधना’ या एका नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे आहेत. अध्यात्म योग्य प्रकारे कळले, तर साधना चांगली करता येते आणि साधना चांगली झाल्यावर पुढील अध्यात्म कळते. ‘अध्यात्म’ हा तात्त्विक (Theory) विषय, तर ‘साधना’ ही कृती (Practical) होय. अध्यात्म हा साधनेचा मूलभूत पाया आहे. साधकाला अध्यात्माच्या संकल्पना जितक्या चांगल्या स्पष्ट असतात, तितकी त्याला आध्यात्मिक प्रगती जलद करणे शक्य होते. भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग इत्यादी साधनेचे अनेक मार्ग आहेत. यांपैकी कोणत्याही मार्गानुसार साधना करावयाची झाली, तरी त्यासाठी बौद्धिक स्तरावर थोडे फार तरी अध्यात्म ठाऊक असणे उपयुक्त असते. यामुळे सनातनच्या कार्यातून कोणत्याही एका विशिष्ट साधनामार्गाचा प्रसार केला जात नाही, तर केवळ अध्यात्माच्या माहितीला अधिक महत्त्व दिले जाते. सनातनचे ग्रंथही याच उद्देशाने प्रकाशित केले जात आहेत.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (९.४.२०२३)