‘मॉल’ : लाभ कि हानी ?

प्रतिकात्मक छायाचित्र

२१ व्या शतकात जीवनपद्धतीत आमूलाग्र पालट होत गेले. जीवन जगणे सुकर झाले. अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या. त्यातील एक भाग म्हणजे ‘मॉल’. ‘मॉल’ म्हणजे जेथे सर्व प्रकारच्या वस्तू एकाच इमारतीमध्ये उपलब्ध होतात. जेणेकरून ग्राहकाला अनेक ठिकाणी जावे लागत नाही. याचे जसे लाभ आहेत, तशी एकप्रकारे हानीही आहे, असे म्हणावे लागेल.

पूर्वी बाजारातून आणायच्या सामानाची सूची करून त्यानुसार खरेदी होत असे. त्यामुळे अतिरिक्त खरेदी होत नव्हती; परंतु आजकाल श्रीमंतांसमवेत गरिबांनाही ‘मॉल’चे आकर्षण वाटते. त्यामुळे आर्थिक स्थिती नसूनही अनावश्यक खर्च केला जातो. ‘मॉल’मध्ये प्रवेश करताच निरनिराळ्या आकर्षक सवलती आपले लक्ष वेधून घेतात. आपण त्याच्या मोहात पडतो, नकळतपणे आवश्यकता नसतांनाही अधिक खरेदी केली जाते. ‘मॉल’मध्ये लहान मुलांना आकर्षित करणार्‍या अनेक वस्तू, गोळ्या, बिस्किटे, खेळणी ठेवलेली असतात. त्यामुळे लहान मुले त्याकडे आकर्षित होऊन या वस्तू घ्यायला पालकांना बाध्य करतात, तसेच सवलतीत घेतलेल्या वस्तूंची उपयोगिता मर्यादा (expiry date) लवकरच संपणार आहे, असेही घरी आल्यावरच लक्षात येते. ‘मॉल’मध्ये मुद्दाम लहान आकाराच्या वस्तू ठेवलेल्या नसतात. मोठे पॅक असल्यामुळे आवश्यक नसले, तरी तो मोठा पॅक घेतला जातो. वस्तूंची वजने लिहूनच पाकिटे तयार केलेली असतात. त्यात काही कमी-जास्त असेल तर कळत नाही.

बर्‍याचदा ‘मॉल’मध्ये कार्डने खरेदी व्यवहार केल्यास त्यावरही सवलत अथवा काही आकर्षक सवलती मिळत असतात. त्यामुळे कार्डने खरेदी व्यवहार करण्याकडे अधिक कल असतो. अशा वेळी खिशात किती पैसे आहेत ? याची काळजी नसल्याने केवळ अवास्तव खरेदी होते. तिथे काही ठराविक आस्थापनांच्याच वस्तू ठेवण्यात येतात, त्यातील बहुतांश विदेशी आस्थापने असण्याची शक्यता असते. त्या घेतल्यामुळे स्वदेशी उद्योगांची आणि लहान व्यापार्‍यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. याचा परिणाम किरकोळ किराणा व्यापार्‍यांच्या व्यवसायात घट झाल्याने त्यांची आर्थिक हानी होत आहे. त्यामुळे हे सर्व पाहिल्यानंतर ‘मॉल’ची व्याख्या करतांना ‘अनावश्यक खर्च करण्याचे खात्रीलायक स्थान’ असा विचार येऊन जातो ! त्यामुळे पुढे येणार्‍या आपत्काळाच्या दृष्टीने आपण प्रत्येक जण आपल्याला जेवढे आवश्यक आहे, तेवढीच खरेदी करण्याची सवय लावूया !

– सौ. रमा देशमुख, नागपूर