मुंबई येथे ‘कॉपी’ करतांना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या !

(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई – परीक्षा चालू असतांना शिक्षकांनी ‘कॉपी’ करतांना पकडल्यानंतर नैराश्य आलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार चेंबूर परिसरात घडला. मुलीला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील आधुनिक वैद्यांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

चेंबूर कॅम्प येथील इंदिरानगर परिसरात १६ वर्षीय मुलगी कुटुंबियांसमवेत रहात होती. ती इयत्ता नववीत शिकत होती.

११ एप्रिल या दिवशी परीक्षा चालू असतांना शिक्षकांना मुलीजवळ कॉपी सापडली. शिक्षकांनी मुलीच्या आईला शाळेत बोलावले आणि घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. या प्रकारामुळे नैराश्य आलेल्या मुलीने रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीय सध्या बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत; मात्र लवकरच त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक अन्वेषणात कोणताही घातपात आढळला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

क्षुल्लक कारणावरून लहान मुलेही अगदी टोकाचा निर्णय घेऊन स्वतःचे जीवन संपवत आहेत. यावरून मुलांची मने किती कमकुवत झाली आहेत आणि समाजात किती दूषित वातावरण निर्माण झाले आहे, हे स्पष्ट होते. साधना किंवा उपासना करणार्‍या मुलांमध्ये अयोग्य गोष्टी न करण्याकडे कल असतो, तसेच साधनेद्वारे आत्महत्येसारख्या घातक प्रवृत्तीवर मात करता येते. त्यामुळे पालकांनी मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांच्यात साधना करण्याची आवड निर्माण केली पाहिजे !