आरोपीवरील खटला रहित करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

भगवान शिवाचे अश्‍लाघ्य विडंबन केल्याचे प्रकरण

अलाहबाद उच्च न्यायालय

अलाहाबाद – फेसबूकवरून भगवान शिवाविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकणी आरोपीवरील खटला रहित करण्यास अलाहबाद उच्च न्यायालयाने नकार दिला. याविषयी आरोपीने प्रविष्ट केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. अलीगड येथील आसिफ याने ही पोस्ट प्रसारित केली होती. याचिका रहित करतांना न्यायमूर्ती जे.जे. मुनिर म्हणाले की, लोक किंवा समूह यांच्यात द्वेष पसरवणारी प्रवृत्ती असणार्‍यांच्या विरोधातील प्रकरणे कठोरपणे हाताळावी लागतील. अशी प्रकरणे सौम्यपणे हाताळून अशी द्वेषपूर्ण मनोवृत्ती वाढण्यास आम्ही खतपाणी घालू शकत नाही.

आरोपीवरील खटला रहित करण्यात यावा, या मागणीसाठी युक्तीवाद करतांना आरोपीचे अधिवक्ता म्हणाले की, ही आक्षेपार्ह पोस्ट आरोपीने बनवली नव्हती, तर ती केवळ ‘फॉर्वर्ड’ (पुढे पाठवणे) केली होती. याचिका रहित करतांना न्यायालय म्हणाले की, एखाद्या पोस्टमुळे २ गटांमध्ये वैमनस्य निर्माण होणार असेल, तर अशी पोस्ट फेसबुकवर ठेवणे हा गुन्हा आहे. या पोस्टमधील भाषा पहाता त्यातून एखाद्याच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा उद्देश दिसून येतो.